भाजपाच्या पाठपुराव्याला यश
पुलगाव,
Pulgaon Railway Station पुलगाव रेल्वे स्टेशन येथील तिकीट आरक्षण खिडकीचा वेळ २७ मेपासून सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत करण्यात आला होता. त्यामुळे रेल्वे तिकीट आरक्षण करण्यासाठी नागरिकांना मर्यादित वेळेत आणि उन्हाच्या तिव्रतेत स्टेशनवर जावे लागत असल्याने मोठी गैरसोय होत होती. याबाबतच्या तक्रारी भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय गाते तसेच शहराध्यक्ष प्रशांत इंगोले यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. तक्रारीची दखल घेत भाजपाने पाठपुरावा करीत हा प्रश्न निकाली काढला असून आता पुलगाव रेल्वे स्टेशनची आरक्षण खिडकी सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत सुरू राहणार आहे.
(संग्रहित छायाचित्र)
प्रवाशांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत जिल्हाध्यक्ष संजय गाते यांनी रेल्वे प्रशासनाच्या नागपूर कार्यालयाकडे निवेदन सादर करून तिकीट आरक्षण खिडकीची वेळ पूर्ववत करण्याची मागणी केली. पुलगाव रेल्वे स्टेशनचे सहाय्यक स्टेशन मास्टर यांना निवेदन देण्यात आले होते. आरक्षण खिडकीची वेळ कोणत्या आदेशानुसार बदलण्यात आली, याबाबतही विचारणा करण्यात आली. या पाठपुराव्यानंतर रेल्वे प्रशासनाने तात्काळ दखल घेत तिकीट आरक्षण खिडकीचा वेळ पूर्ववत केले. त्यामुळे पुलगाव शहरातील रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत इंगोले, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष मंगेश झाडे, जिल्हा उपाध्यक्ष कपिल शुला, शहर महामंत्री अरविंद भार्गव, उपाध्यक्ष अरुण मिश्रा, किशोर पाचवारे, सचिव सुमित शहाडे, राजू मेहता तसेच इतर पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.