अमरावती,
stormy-rains : सोमवारी दुपारी साडेचार वाजतच्या दरम्यान आलेल्या वादळी पावसाने अमरावती शहराचे बेहाल केले आहे. अनेक ठिकाणी झाडे पडल्याने वीज वाहिन्या तुटल्या. परिणास्वरूप निम्म्या शहराचा वीज पुरवठा खंडीत झाला. काही घरांवरची छप्परे देखील उडाली.
आकाशात दुपारी ३.३० वाजतापासून काळ्या ढगांची गर्दी होताना दिसली. दरम्यानच जोरात वाराही सुटला. पावसाचे वातावरण तयार होताच जोरात पाऊस सुरू झाला. सोबत प्रचंड वेगाने वादळ असल्याने काही क्षणात सर्वांची दाणादाण उडाली. वारा इतका जोरात होता की तो झाडांना सहन झाला नाही. सबनीस प्लॉट येथील कालीमाता मंदिराजवळील वडाचे मोठे झाड उन्मळून पडले. जोग स्टेडीयम, बस स्थानक रोड, पोलिस आयुक्त कार्यालयाजवळील झाडे तुटून पडली. पन्नालाल बगिचा परिसरातही झाडे पडली. अनेक झाडांच्या फाद्या तुटून दूर जाऊन पडल्या. झाडाच्या पडझडीने अनेक मुख्य भागातला वीज पुरवठा खंडीत झाला. तुटलेली व पडलेली झोडे बाजुला करण्यासाठी महापालिकेच पथक कार्यरत झाले होते. तर वीज पुरवठा पूर्वत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी कामाला लागले होते. वृत्तलिहेस्तोवर वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता.
टिनाच्या घरांवरची छत्रे वादळाने उडाली. रस्त्यावर व इमारतींवर लावण्यात आलेली होर्डींग देखील वादळाने उडाले. झाड कोसळल्याने काही दुचाकी व चारचाकींचे नुकसान झाले. तब्बल पाऊण तास आलेल्या वादळी पावसाने सर्वांच्या मनात धडकी भरविली होती. या पावसाने अमरावतीला बेहाल केले.