दहावी-बारावी पुरवणी परीक्षांचे प्रवेश पत्र जारी

    दिनांक :09-Jun-2026
Total Views |
- १६ जूनपासून सुरू होणार परीक्षा

नागपूर, 
Class 10 and 12 Supplementary Exams महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी (एसएससी) आणि बारावी (एचएससी) पुरवणी परीक्षा २०२६ साठी प्रवेश पत्र जारी केली आहेत. पुरवणी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे.
 
 
 
EXZ
 (संग्रहित छायाचित्र)
 
दहावीची पुरवणी परीक्षा १६ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत होणार असून परीक्षा दोन सत्रांत घेतली जाईल. सकाळचे सत्र सकाळी ११ ते दुपारी २ आणि दुपारचे सत्र दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत असेल. परीक्षांची सुरुवात भाषा विषयांपासून होणार आहे.
बारावीची पुरवणी परीक्षा १६ जूनपासून सुरू होऊन ८ जुलै २०२६ पर्यंत चालणार आहे. या परीक्षा सकाळी ११ ते दुपारी २ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६ या दोन सत्रांत घेतल्या जातील. इंग्रजी विषयाच्या पेपरने परीक्षांना सुरुवात होणार असून सामान्य ज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान विषयांनी परीक्षा संपणार आहेत.
नियमित बोर्ड परीक्षेत एक किंवा अधिक विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या पुरवणी परीक्षेला बसण्याची संधी मिळणार आहे.
मंडळाने विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रावरील नाव, आसन क्रमांक, परीक्षा केंद्र आणि इतर तपशील काळजीपूर्वक तपासण्याचे आवाहन केले आहे. परीक्षेच्या दिवशी हॉल तिकिटाची छापील प्रत सोबत ठेवणे अनिवार्य आहे.
अधिक माहिती आणि अद्ययावत तपशीलांसाठी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.