एनसीएसकडूनही अधिकृत पुष्टी
भूकंपाच्या धक्क्याच्या दाव्याने नागरिकांत भीतीचे वातावरण
वणी,
Earthquake in the Wani-Maregaon वणी-मारेगाव परिसर पुन्हा एकदा भूकंपाच्या चर्चेने हादरला असून, मारेगाव आणि पांढरकवडा दरम्यान रविवार, 8 जूनच्या संध्याकाळी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवल्याचा दावा भूवैज्ञानिक प्रा. सुरेश चोपणे यांनी केला आहे. त्यांच्या मते, संध्याकाळी सुमारे 5 ते 6 वाजण्याच्या दरम्यान या परिसरात अंदाजे 3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला असावा. तसेच आगामी काळात पुन्हा भूकंपाचे धक्के बसण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
प्रा. चोपणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वणीमारेगावपांढरकवडा हा पट्टा भूगर्भीय हालचालींच्या दृष्टीने संवेदनशील मानला जात असून, यापूर्वीही या भागात भूकंपाचे सौम्य धक्के नोंदविले गेले आहेत. विशेषतः 199495 दरम्यान वणी शहरालगतच्या बोर्डामारेगाव परिसरात भूकंपाच्या हालचाली जाणवल्या होत्या. त्या काळात अनेक नागरिकांनी जमिनीतील कंप अनुभवला होता.
भूगर्भीय अभ्यासानुसार बोर्डा गावाजवळील धरण परिसरात चुनखडीचे मोठे साठे असून, या भागातील भूस्तराची रचना इतर भागांपेक्षा वेगळी असल्याचे सांगितले जाते. पूर्वी झालेल्या भूकंपाच्या धक्क्यांचा परिणाम या धरण परिसरावरही जाणवल्याची नोंद असल्याचे प्रा. चोपणे यांनी नमूद केले. त्यामुळे या परिसरातील भूगर्भीय घडामोडींवर सातत्याने लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे मत तज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, भूकंपाचा धक्का बसल्याची माहिती समाज माध्यमांवर आणि नागरिकांमध्ये वेगाने पसरल्यानंतर अनेक भागांमध्ये चर्चांना उधाण आले. त्यातच भारत सरकारची अधिकृत यंत्रणा नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) कडून याबाबत अधिकृत पुष्टी करण्यात आल्यामुळे तर चर्चेला अधिकच उधाण आले. त्यामुळे वणी, मारेगाव आणि पांढरकवडा परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील रहिवाशांमध्ये संभाव्य भूकंपाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. भविष्यातील कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे, तसेच संबंधित विभागांनी या भागाचा सखोल भूगर्भीय अभ्यास करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.