अनिल कांबळे
नागपूर,
Female student's suicide शहरातील नामांकित कॉलेजमध्ये ‘कंपनी सेक्रेटरी’चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारी दोन वाजता वाडी परिसरात उघडकीस आली. प्रियंका रुपराव गणवीर (२०,पंचशील चौक,आंबेडकर नगर) असे मृत तरुणीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंकाचे वडिल रुपराव गणवीर यांचे गॅस-कुकर दुरुस्तीचे दुकान आहे. त्यांना एकुलती मुलगी प्रियंका ही हिस्लॉप कॉलेजमध्ये सीएसचे शिक्षण घेत आहे. ती गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होती. त्यामुळे ती कुणाशी जास्त बोलत नव्हती. ती नेहमी चिडचिड करायची. ती मंगळवारी दुपारी एकटी घरी होती. तिचे वडिल दुकानात गेले होते तर आई शिकवणी वर्गाला गेली होती. दुपारी बारा वाजता वडिल घरी आले असता प्रियंका ही जेवण करीत होती. त्यानंतर ते दुकानावर पुन्हा निघून गेले. दुपारी दोन वाजता प्रियंकाने घरात ओढनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यादरम्यान, तिची आजी अमरावतीवरुन नागपूरला आल्यानंतर घरी पोहचली असता हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी वाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मात्र, प्रियंकाच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. या प्रकरणी वाडी पोलिस पुढील तपास करीत आहेत.