अनिल कांबळे,
नागपूर,
bribe-case : मुख्यालयात कार्यरत अपघातग्रस्त पोलिस हवालदाराला चार्जशिटची कॉपी देण्यासाठी गणेशपेठमधील पोलिस कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केली. पोलिस हवालदाराला लाचेची रक्कम स्वीकारताना भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी रंगेहाथ अटक केली. अतिष निकोडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, या कारवाईमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. एसीबीच्या या कारवाईनंतर पोलिस ठाण्यातील काही कर्मचारी अचानक बेपत्ता झाले होते, अशी माहिती समोर आली.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे स्वतः पोलिस विभागात कार्यरत आहेत. ड्युटीदरम्यान त्यांचा अपघात झाला होता. या अपघाताची नोंद गणेशपेठ पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास हवालदार आतिष निकोडे यांच्याकडे होता. अपघात भरपाई मिळविण्यासाठी तक्रारदाराने न्यायालयात दावा दाखल केला असून, त्यासाठी त्यांना संबंधित प्रकरणातील आरोपपत्राची (चार्जशीट) प्रत आवश्यक होती. आरोपपत्राची प्रत देण्यासाठी निकोडे यांनी तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांची लाच मागितली. लाच देण्यास नकार देत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीने लाचेच्या मागणीची पडताळणी करून सापळा रचला. बुधवारी गणेशपेठ पोलिस ठाण्यात निकोडे याला लाचेचा पहिला हप्ता म्हणून ३ हजार रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई एसीबी पोलिस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलिस अधीक्षक माधुरी बाविस्कर आणि विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत उपअधीक्षक महेश भोरटकर, पोलिस निरीक्षक जितेंद्र वैरागडे तसेच एसीबीच्या पथकातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
३ हजार स्वीकारताना जेरबंद
एसीबीने तक्रारीनंतर लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता, हवालदार आतिष निकोडे याने आरोपपत्राची प्रत देण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार रचलेल्या सापळ्यात निकोडे याला लाचेचा पहिला हप्ता म्हणून ३ हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली. आरोपीविरुद्ध गणेशपेठ पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.