अमरावतीच्या स्वच्छता कंत्राटाची विभागीय चौकशी

    दिनांक :10-Jul-2026
Total Views |
मंत्री उदय सामंत यांची घोषणा आमदारांच्या मुद्दांची दखल
 
अमरावती, 
Amravati Municipal Corporation अमरावती महानगरपालिकेने शहरातल्या स्वच्छतेसाठी दिलेल्या कंत्राटाच्या निविदाप्रक्रियेची विभागीय चौकशी करण्याचे आदेश मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी सभागृहात दिले. आमदार धिरज लिंगाडे व आमदार संजय खोडके यांनी सदर मुद्दा उपस्थित केला होता.
 
 
amt
 
अमरावती महानगर पालिका निवडणुकीच्या पूर्वी प्रशासकराज होते. त्या काळात स्वच्छतेच्या कामासंबंधी निविदा प्रक्रिया राबवून २८ नोव्हेबर २०२५ रोजी मेसर्स कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला कंत्राट देण्यात आले. पुढे त्यांच्यासोबत करारनामा करण्यात आला. मात्र सदर कंपनीने निविदा व करारनामानुसार स्वच्छतेची कामे केली नसल्याने नागरिकांच्या तक्रारी समोर आल्या आहे. सर्व नगरसेवकांनी आमसभेत हा मुद्दा लावून धरला होता. पूर्वीची स्वच्छता कंत्राटाची निविदा ३० कोटींची असताना नंतर ४३ कोटींची निविदा काढण्यात आली. पूर्वीच्या निविदेत घरगुती कचरा संकलन व विल्हेवाट लावण्याचे कामाबरोबरच धुवारणी, फवारणीची कामे सुद्धा अंतर्भूत होती. मात्र नव्या निविदेत ही कामे वगळण्यात आली. हे सर्व मुद्दे संशयास्पद असल्याचा आरोप आ. संजय खोडके यांनी सभागृहात केला. याच पद्धतीचे मुद्दे आ. धिरज लिंगाडे यांनी देखील मांडले.
 
 
यावर मंत्री उदय सामंत उत्तर देताना म्हणाले, सदस्यांनी उपस्थित केले मुद्दे खरे आहेत. त्याची दखल घेत या संपूर्ण प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत सखोल चौकशी करण्यात येईल. ९० दिवसांमध्ये या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल प्राप्त होताच त्याप्रमाणे कार्यवाही करणार असल्याचे आश्वासन त्यांनी सभागृहात दिले.