निराकार मातीला श्रीगणेशाचे रूप देण्यात कारागीर व्यस्त

    दिनांक :10-Jul-2026
Total Views |
चितारओळीत बाप्पाच्या आगमनाची चाहूल; महागाईचे आव्हान, कुशल कारागिरांची टंचाई

नागपूर, 
Chitaroli: Ganesha murti अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची चाहूल आता शहरातील प्रसिद्ध चितारओळीत स्पष्टपणे जाणवू लागली आहे. मातीचा सुगंध, लाकडाच्या चौकटी, तणसाच्या पेंड्या आणि कारागिरांच्या कुशल हातांनी निराकार मातीला श्रीगणेशाचे रूप देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. दिवस-रात्र मेहनत घेत मूर्तिकार बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झाले असून चितारओळीतील प्रत्येक गल्ली गणेशमय वातावरणाने भारून गेली आहे.
 
 
ganesh
 
पिढीजात मूर्तिकार विजय सूर्यवंशी सांगतात, गणेशमूर्ती घडविण्याची तयारी प्रत्यक्षात मार्च महिन्यापासूनच सुरू होते. सर्वप्रथम नैसर्गिक माती मागवून ती भिजवून ठेवली जाते. त्यानंतर तणस, गव्हांडा, कापूस, लाकूडफाटा आणि रंग यांसारख्या साहित्याची खरेदी केली जाते. शहरात कारागीर सहज उपलब्ध होत नसल्याने ग्रामीण भागातून कारागीर बोलाविले जातात. एप्रिल महिन्यापासूनच मूर्ती साकारण्याच्या कामाला वेग येतो, असे ते सांगतात.
धानाच्या शेतातील मातीला प्राधान्य
गणेशमूर्तीचा आत्मा म्हणजे तिची माती. त्यामुळे भंडारा, गोंदिया आदी जिल्ह्यांतील धान काढणीनंतर शेतातून बाहेर पडणाऱ्या नैसर्गिक मातीला मूर्तिकार विशेष पसंती देतात. मोठ्या मूर्तींसाठी तीन ते चार ट्रक मातीची आवश्यकता भासते. इतवारी व कॉटन मार्केट परिसरातून तणसाच्या पेंड्या, तर लकडगंज भागातून लाकूडफाटा आणून मूर्ती निर्मितीची तयारी पूर्ण केली जाते.
चेहरा आणि बोटांसाठी कापसाची माती
मूर्ती तयार करताना दोन प्रकारची माती वापरली जाते. गव्हांड्याचे मिश्रण असलेली माती मूर्तीचे शरीर घडविण्यासाठी वापरली जाते, तर चेहरा, हातांची बोटे आणि सूक्ष्म कलाकुसर करण्यासाठी मातीमध्ये कापूस मिसळला जातो. या मिश्रणामुळे मूर्तीला नाजूकपणा आणि आकर्षक भाव प्राप्त होतात. मूर्तीचा सुरेखपणा हा या मातीच्या गुणवत्तेवरच अवलंबून असल्याचे मूर्तिकार सांगतात.
महागाईची झळ; मूर्तिकारांची आर्थिक कसरत
चितारओळीत जागेची कमतरता असल्याने अनेक मूर्तिकारांनी पावसापासून संरक्षणासाठी तात्पुरती टिनांची शेड उभारली आहेत. यंदा माती, तणस, लाकूडफाटा, रंग तसेच कारागिरांच्या मजुरीत मोठी वाढ झाली आहे. उत्पादन खर्च वाढल्याने मूर्तींच्या किमती वाढविण्याची वेळ येते; परंतु किंमत वाढली की ग्राहक नाराजी व्यक्त करतात. खर्च आणि ग्राहकांची अपेक्षा यांचा समतोल साधताना मूर्तिकारांची कसरत होत असल्याचे त्यांनी सांगितले.