आठ वर्षीय चिमुरडीशी अश्लील कृत्य
नागपूर,
Hudkeshwar Police Station हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आठ वर्षीय चिमुरडीशी अश्लील कृत्य करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी १५ दिवसांच्या अथक तपासानंतर अटक केली आहे. कुबेर अनिल पोहाने (वय २०, रा. स्वामीपुरम सोसायटी, चिंचभवन) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा चंद्रपूर जिल्ह्यातील पठाणपुरा वॉर्ड येथील रहिवासी आहे.
ही घटना २४ जून २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास घडली. पीडितेशी मोपेडवर आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने बोलून तिला सोबत नेले. त्यानंतर आरोपीने तिच्याशी अश्लील कृत्य केले. ही बाब कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी देत आरोपीने तिला घराजवळ सोडून पलायन केले. पीडितेचे आई-वडील कामानिमित्त तीन दिवस घराबाहेर असल्यामुळे तक्रार नोंदविण्यास उशीर झाला. त्यानंतर मुलीच्या जबाबावरून हुडकेश्वर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७५ तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम ८ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी मानेवाडा चौक, शताब्दीनगर चौक, जयप्रकाशनगर, जयताळा, हिंगणा रोड, वायसीसी कॉलेज चौक आदी परिसरातील दोनशेहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. या तपासातून आरोपीच्या मोपेडचा नोंदणी क्रमांक हाती लागला. त्याआधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन अवघ्या १५ दिवसांत त्याला अटक केली. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे, पोलिस निरीक्षक पवन रामटेके तसेच हुडकेश्वर पथकाने केली.