तिवसा मतदारसंघातील आरोग्य केंद्रांचे श्रेणीवर्धन करा

    दिनांक :10-Jul-2026
Total Views |
आमदार राजेश वानखडे यांची विधानसभेत मागणी
 
अमरावती, 
tivsa matadarsangh आरोग्य सेवांचा विस्तार करण्याकरिता तिवसा मतदार संघातील मोठ्या लोकसंख्येच्या गावातील प्रा.आरोग्य केंद्रांचे श्रेणीवर्धन करा व रिक्त पदे तातडीने भरा, अशी मागणी आमदार राजेश वानखडे यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. आरोग्य मंत्र्यांनी त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. तिवसा विधानसभा मतदारसंघातील माहुली जहागीर, वलगाव, नेरपिंगळाई, कुऱ्हा, खोलापूर ही गावे लोकसंख्येच्या अनुषंगाने मोठी आहे. त्यांना लागून असलेल्या गावातील नागरिक सुद्धा आरोग्य सुविधेकरीता याच आरोग्य केंद्रांवर अवलंबून आहेत. या आरोग्य केंद्रांवर रुग्ण संख्या जास्त असल्यामुळे आरोग्य सेवा अपुरी पडत आहे.
 
 
rajesh
 
त्यामुळे नागरिकांना नाईलाजाने उपचारा करिता तालुक्याच्या ठिकाणी धाव घ्यावी लागते. येथील नागरिकांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी या आरोग्य केंद्रांचे ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेणी वर्धन करण्याचा मुद्दा आमदार राजेश वानखडे यांनी शुक्रवारी सभागृहात लक्षवेधीच्या माध्यमातून मांडला. त्यावर आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आपल्या उत्तरात प्राथमिक आरोग्य केंद्रांचे श्रीवर्धन ग्रामीण रुग्णालयात करीत असताना शासनाचे यापूर्वीचे जे निकष होते, त्या निकषांमध्ये आता बदल करण्याची गरज असल्याचे मान्य करीत लोकप्रतिनिधी द्वारे सातत्याने होत असलेल्या मागणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार बृहत् आराखडा तयार करण्याचे कार्य शासन स्तरावर सुरू असून हा आराखडा पूर्ण झाल्यानंतर आ. वानखडे यांच्या मागणी प्रमाणे उपरोक्त आरोग्य केंद्रांचे 30 खटांच्या ग्रामीण रुग्णालयांमध्ये रूपांतरण निश्चित करण्यात येईल असे आश्वासित केले.