शेतकऱ्याच्या अवयवदानाने पाचजणांच्या जीवनात आनंद

    दिनांक :10-Jul-2026
Total Views |
नागपूर, 
Kashiram Irdande नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातल्या उखळी गावातील एका वारकरी शेतकऱ्याच्या अवयवदानाने पाचजणांच्या जीवनात आनंद पेरला. काशीराम पांडुरंग इरदंडे हे शेती व दुग्धव्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. शांत वृत्तीचे काशीराम यांचा तबला वादन आणि वारकरी भजन म्हणणे हा छंद. ६ जुलैला सकाळी दूध जमा करून ते दुचाकीने घरी जात असताना मागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
 
 
Kashiram-Iradande
 
त्याला लगेचच भिवापूर प्राथमिक आरोग्य केंद्र व नंतर नागपूरला मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मेंदूत तीव्र रक्तस्रावाचे निदान झाले. त्यावर डॉ. सोमा चाम यांच्या देखरेखीखाली अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, डॉ. सोमा चाम, डॉ. आयेशा खान, डॉ. पलल्वी वानखेडे, डॉ. सोनल प्रभू, डॉ. नेहा बोरकर आदींच्या चमूने तपासून, चाचण्यांनंतर काशीराम यांना मेंदूमृत घोषित केले. समन्वयक डॉ. सुमित चाहकर, धीरज कुर्वे आदींनी काशीराम यांची पत्नी, मुलगी व मुलाचे समुपदेशन केले. त्यांनी काशीराम यांच्या यकृत, दोन मूत्रपिंड व बुबुळ दानास संमती दिली.
क्षेत्रीय अवयव प्रत्यारोपण समितीचे अध्यक्ष डॉ. मनीष श्रीगिरीवार, सचिव डॉ. शैलेश गहुकर, दिनेश मंडपे आदींनी पुढील कार्यवाही केली. प्रतीक्षा यादीनुसार एक मूत्रपिंड अतिविशेषोपचार रुग्णालय, दुसरे मूत्रपिंड मॅक्स हॉस्पिटल, यकृत वोक्हार्ट, बुबुळ मेडिकल रुग्णालयातील रुग्णात प्रत्यारोपित करण्यात आलेे. मेडिकलच्या कर्मचाऱ्यांनी पार्थिवास आदरांजली वाहिली तसेच रुग्णवाहिका निःशुल्क उपलब्ध करून दिली.