मुलीच्या इच्छेविरुद्ध लावला बालविवाह

    दिनांक :11-Jul-2026
Total Views |
७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल
 
वरुड, 
Child Marriage शेंदूरजनाघाट पोलिस स्टेशन हद्दीत १७ वर्षीय युवतीचा तिच्या कुटुंबीयांनी तिच्या इच्छेविरुद्ध बालविवाह केल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस तक्रारीनंतर उघड झाला. या प्रकरणी पोलिसांकडून बालविवाह कायद्यांतर्गत ७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
 
 
Child Marriage
 
प्राप्त माहितीनुसार, पीडिता अल्पवयीन असल्याची माहिती असून सुद्धा तिच्या कुटुंबातील काही लोकांनी तिला न सांगता रूपेश कवडेती या युवकासोबत तिचा विवाह जुळवला. माझे वय १८ वर्षे पूर्ण झाले नसताना मला जबरदस्तीने रूपेशसोबत विवाह करायला लावत असल्याची माहिती तिने तिच्या वडिलांना फोनवरून दिली. परंतु, तिच्या वडिलांनी तिला सहकार्य न करता तू हा विवाह केला नाहीस तर मी विष प्राशन करून मरून जाईल, अशी धमकी दिली. त्यामुळे तिने या धमकीला घाबरून या विवाहाला होकार दिला. या विवाहाला तिचे काका सुरेश कुमरे सुद्धा हजर होते. ती अल्पवयीन असल्याची माहिती असून सुद्धा संबंधित आरोपींनी जबरदस्तीने तिचा विवाह २२ ते २४ जून दरम्यान लावून दिला. पीडितेने ९ जुलैला शेंदूरजनाघाट पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी एकूण ७ लोकांविरुद्ध बालविवाह कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले. यामध्ये देवराव कुमरे, नितेश नवडेक, रा. वघार वंडली, रूपेश बलदेव कवडेती, योगिता पाटील, कमलेश पाटील, रा. अंबाडा, सविता धुर्वे, पंचफुला कवडेती, रा. रवाळा यांचा समावेश आहे. घटनास्थळ मोर्शी पोलिस ठाणे हद्दीतील असल्याने शेंदूरजनाघाट पोलिसांकडून ते वर्ग करण्यात आल्याने पुढील तपास मोर्शी पोलिस करीत आहेत.