नागरिकांनी स्वतः बुजवले खड्डे
सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात संताप
मारेगाव,
Dongargaon Road Repair मार्डीपासून अवघ्या एक ते दीड किमी अंतरावर असलेल्या डोंगरगावची प्रमुख बाजारपेठ मार्डी असल्याने ग्रामस्थांना दैनंदिन कामांसाठी या मार्गानेच प्रवास करावा लागतो. मात्र या मार्गावरील खड्ड्यांमुळे अवघे एक ते दीड किमी अंतर पार करणेही सध्या नागरिकांसाठी मोठी कसरत ठरत आहे. संबंधीत विभागाला वारंवार विनंती करूनही त्यांनी कोणतीही उपायोजना न केल्याने अखेर डोंगरगावच्या नागरिकांनी स्वत:च रस्त्यावरील खड्डे बुजवले.
मारेगावमार्डी मार्गाला जोडणारा डोंगरगावमार्डीदेवाळा हा महत्त्वाचा रस्ता सुमारे 30 ते 35 वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. सध्या या रस्त्यावर डांबरीकरणाचा लवलेशही दिसत नाही. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने पावसाळ्यात त्यामध्ये पाणी साचते. त्यामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वारांसह इतर वाहनचालकांचे किरकोळ अपघात वारंवार घडत आहेत.
परिणामी या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध म्हणून डोंगरगावातील नागरिकांनी स्वतःच हातात टोपले, फावडे घेऊन रस्त्यावरील खड्ड्यांतील पाणी काढत खडी-माती टाकून खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले.
रस्ता दुरुस्तीचे काम नागरिकांनी करायचे, तर संबंधित विभाग नेमका कशासाठी? असा संतप्त प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. या मार्गाची तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी डोंगरगाववासींनी केली आहे. या रस्ता दुरुस्तीच्या कामात डोंगरगाव येथील दिवाकर पवार, नितीन जुमडे, ज्ञानेश्वर जुमडे, दिनेश जुमडे, उत्तम पवार, मनोज कनाके, प्रीतम जुमडे, नारायण जुमडे, खुशाल महाजन, रणजित सिरामे तसेच अनेक युवकांनी पुढाकार घेतला.