शुभेच्छा फलकावरील फोटोला फासले काळे

    दिनांक :11-Jul-2026
Total Views |
सीसीटीव्हीत दोन संशयित कैद
शिवसेना-प्रहार कार्यकर्त्यांचा संताप
 
अचलपूर, 
Greeting Board आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात लावण्यात आलेल्या शुभेच्छा फलकाचे विद्रुपीकरण करून प्रहार जनशक्ती पक्षाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष तथा अचलपूर नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती बल्लू उर्फ महेंद्र जवंजाळ यांच्या छायाचित्राला अज्ञात इसमांनी काळे फासल्याची घटना समोर आली. यामुळे अचलपुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आ. बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त अचलपूर व परतवाडा शहरात विविध ठिकाणी शुभेच्छा फलक उभारण्यात आले होते. विदर्भ मिल परिसरातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यालयाजवळ लावलेल्या अशाच एका बॅनरवर आमदार बच्चू कडू यांच्यासह बल्लू उर्फ महेंद्र जवंजाळ यांचे छायाचित्रही झळकत होते. मात्र, ९ जुलैच्या मध्यरात्री अज्ञात इसमांनी या बॅनरवरील बल्लू जवंजाळ यांच्या छायाचित्राला काळे फासून विद्रुपीकरण केल्याचा प्रकार उघडकीस आला.
 
 
falak
 
विशेष म्हणजे, हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, तोंडाला दुपट्टा बांधलेल्या दोन संशयित व्यक्ती हे कृत्य करताना स्पष्टपणे दिसत असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेनंतर बल्लू जवंजाळ यांनी अचलपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिस प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.
घटनेची माहिती मिळताच शिवसेना व प्रहार जनशक्ती पक्षाचे शेकडो कार्यकर्ते अचलपूर पोलिस ठाण्याबाहेर जमा झाले. दोषींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला. या घटनेची गंभीर दखल घेत अचलपूर पोलिसांनी तपासाला वेग दिला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.