Illegal fishing अप्पर वर्धा धरणाच्या जलाशयावर सध्या अवैध मत्स्य व्यावसायिकांनी कब्जा केला असून संबंधित दोन्ही विभागांचे अधिकारी मूग गिळून बसले आहेत. पश्चिम विदर्भाला वरदान असलेल्या मोर्शी तालुक्यातील सिंभोरा येथील अप्पर वर्धा जलाशयातील मासेमारीचा कंत्राट वरुड तालुक्यातील राजुरा बाजार येथील नळ-दमयंती सागर मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेने मुंबई येथील मत्स्य आयुक्ताच्या कार्यालयात झालेल्या लिलावात सर्वात जास्त बोली बोलून जानेवारी २०२६ ते २०३१ या पाच वर्षांसाठी घेतला आहे. त्यापोटी लिलावात बोली केलेली दोन वर्षांची रक्कम मत्स्य व्यवसाय विभागाकडे जमा केल्यानंतर संस्थेला मासेमारीचा अधिकार मत्स्य व्यवसाय विभागाने दिला होता. मात्र, मासे संकलनाकरिता असलेल्या झिरो पॉईंट येथील पाटबंधारे विभागाच्या जागेवर अवैध मत्स्य व्यावसायिकांनी कब्जा केल्याने संस्थेने मत्स्य व्यवसाय विभाग अमरावती तसेच अप्पर वर्धा धरण मोर्शी कार्यालयात अतिक्रमण हटविण्यासंबंधी आठ महिन्यांपासून पत्रव्यवहार सुरू आहे. या पत्रव्यवहाराकडे पाटबंधारे विभाग तसेच मत्स्य व्यवसाय विभाग दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे कंत्राटदार मासेमारी संस्थेला सहा महिन्यांपासून लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.
हल्ली पाऊस सुरू असल्याने वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे माशांची चढण होत असते. यातून पंजीबद्ध मासेमारी सहकारी संस्थेच्या सभासदांना रोजगार मिळतो. मात्र, अवैध मासेमार जलाशयातून मासोळ्यांची चोरी करीत आहेत. अधिकाऱ्यांनी याबाबत तत्काळ कारवाई करावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, कार्यकारी अभियंता उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभाग तसेच उपविभागीय महसूल अधिकारी मोर्शी, तहसीलदार, उपविभागीय पोलिस अधिकारी व मोर्शीच्या ठाणेदारांना दिले असल्याची माहिती नळ-दमयंती सागर मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेचे अध्यक्ष वासुदेव सुरजुसे यांनी दिली.