ढोल-ताशांच्या गजरात स्वागत
जिल्ह्यातील भाजपा नेत्यांची उपस्थिती
धामणगाव रेल्वे,
Pratap Adasad अमरावती जिल्हा ग्रामीण भाजपा जिल्हाध्यक्षपदाचा पदभार शनिवारी, ११ जुलैला आ. प्रताप अडसड यांनी स्वीकारला.अमरावतीच्या राजापेठ येथील भाजपा जिल्हा कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानी खा. डाॅ. अनिल बोंडे, तर प्रमुख अतिथी आ. राजेश वानखेडे, आ. चंदू यावलकर, जिल्हा प्रभारी अविनाश देव, अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवानी, विदर्भ संयोजक दिनेश सूर्यवंशी, माजी जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, प्रशांत देशपांडे, निवेदिता चौधरी, अमरावती भाजपा शहराध्यक्ष नितीन धांडे, मीना पाठक उपस्थित होते.
विदर्भात त्या काळात भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण अडसड यांनी पक्ष उभा केला. त्यांच्यामुळे आज वैभवाचे दिवस पाहायला मिळत आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी अडसड यांच्यावर भाजपा जिल्हाध्यक्षपदाची जी जबाबदारी टाकली ते समर्थपणे पार पाडणार असल्याचे मत खा. डॉ. अनिल बोंडे यांनी व्यक्त केले.
आगामी निवडणुकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती आपल्याला काबीज करायच्या आहेत. त्यासाठी आ. प्रताप अडसड यांचे नेतृत्व मोठे ठरणार असल्याचे माजी भाजपा जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख म्हणाले. यावेळी निवेदिता चौधरी, आ. राजेश वानखडे, आ. चंदू यावलकर, जिल्हा प्रभारी अविनाश देव, विदर्भ संयोजक दिनेश सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त करून प्रताप अडसड यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यकर्त्यांना पाठबळ देणार
भाजपात सर्वात प्रथम राष्ट्र, समाज व नंतर आपण आहोत. भाजपा हा पक्ष कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे उभा आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य माणसांची कामे करावी. त्यांच्या अडचणी आपणापर्यंत आणाव्यात, ते सोडविण्याचे काम आपले आहे. आपण भाजपा कार्यकर्त्यांना पाठबळ देणार असल्याचे मत नवनियुक्त जिल्हाध्यक्ष आ. प्रताप अडसड यांनी मांडले.
यावेळी जिल्ह्यातील मंडळ अध्यक्ष, शक्ती प्रमुख, बुथ प्रमुख, नगराध्यक्ष तसेच नगरसेवक, भाजपाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. संचालन भाजपा जिल्हा सरचिटणीस सुमित पवार तर आभार शंतनू देशमुख यांनी मानले. ढोल-ताशांच्या गजरात प्रताप अडसड यांचे स्वागत करण्यात आले. जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या.