बोगस बियाणे उत्पादक कंपनीविरुद्ध गुन्हे दाखल

    दिनांक :11-Jul-2026
Total Views |
बियाणे उगवलेच नाही अमरावती जिल्ह्यात ४७० तक्रारी
 
अमरावती, 
Spurious seeds जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अधिक सरासरी मिळण्याच्या अपेक्षेने बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने उत्पादित सोयाबीन बियाणांच्या ‘हुतुतू’ वाणाची मोठ्या प्रमाणात खरेदी करून पेरणी केली. हे बियाणे उगवलेच नसल्याच्या जिल्ह्यातून एकूण ४७० तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या होत्या. बोगस बियाणांचे हे प्रकऱण थेट विधिमंडळातही पोहोचले होते. शेतकऱ्यांनी संबंधित कंपनीविरुद्ध कारवाईची मागणी करीत कृषी विभागाच्या कार्यालयावर मोर्चे काढत आंदोलने केली होती.
 
 
soya kdslsdk
 
बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी जालना जिल्ह्यातील गेवराई बाजार येथील आहे. या कंपनीच्या हुतुतू वाणाच्या सोयाबीन बियाणांचे नमुने मार्केटमध्ये विक्रीकरिता उपलब्ध होताच घेण्यात आले होते. हे नमुने बियाणे तपासणी प्रयोगशाळा नागपूर येथे पाठविण्यात आले. प्रयोगशाळेच्या अहवालानुसार या कंपनीचे एकूण सात नमुने उगवणक्षमतेमध्ये अप्रमाणित आढळले. त्यामुळे या कंपनीकडून बोगस बियाणांचा पुरवठा झाला यावर शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर हुतुतू वाणाची खरेदी करून पेरणी केली होती. पण हे बियाणे उगवलेच नाही.
 
 
शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने गुण नियंत्रण अधिकाऱ्यांनी काढलेल्या अहवालाच्या आधारे अप्रमाणित बियाणांचा पुरवठा करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कृषी विभागामार्फत बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर शासनाच्या वतीने जिल्हा परिषद अमरावतीचे मोहीम अधिकारी प्रवीण खर्चे यांनी फौजदारी तक्रार गाडगेनगर पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसांनी संबंधित कंपनीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
कारवाईदरम्यान पंचायत समिती अमरावतीचे कृषी अधिकारी पवनकुमार ढोमणे, तालुका कृषी अधिकारी कार्यालय अमरावतीचे गुण नियंत्रण अधिकारी शुद्धोधन वरघट तसेच पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ही कारवाई विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अर्चना निस्ताने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, कृषी विकास अधिकारी मल्ला तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.