माझे गाव आरोग्य संपन्न गावचा संकल्प
बुलढाणा,
'World Population Day' वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणारी आव्हाने आणि छोटे कुटुंब, सुखी कुटुंब या संकल्पनेचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी दि. ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे भव्य जनजागृती रॅली आणि मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकसंख्या स्थिरीकरण, कुटुंब कल्याण, माता-बाल आरोग्य आणि आरोग्यदायी समाजनिर्मिती या विषयांवर उपस्थित तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले. यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयातून भव्य लोकसंख्या दिन जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना लहान कुटुंबाचे महत्त्व, सुजाण पालकत्व, मातृ व बाल आरोग्य संवर्धन तसेच लोकसंख्या नियंत्रणासाठी आवश्यक असणार्या विविध उपाययोजनांबाबत घोषणा व फलकांच्या माध्यमातून प्रभावी संदेश देण्यात आला. कार्यक्रमादरम्यान जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव यांनी वाढत्या लोकसंख्येचे दुष्परिणाम आणि आव्हानांवर प्रकाश टाकला. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर उपलब्ध असलेल्या तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी कुटुंब नियोजन साधनांची माहिती देऊन नागरिकांनी या विनामूल्य शासकीय सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत आरोग्यदायी, सशक्त आणि प्रगत गाव घडविण्याचा सामूहिक संकल्प करण्यात आला. नागरिकांचे आरोग्य सुधारल्यास गावाची आणि पर्यायाने देशाची प्रगती साध्य होईल, हा विचार या अभियानातून मांडण्यात आला. शेवटी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण घोंगटे यांनी नागरिकांनी शासकीय आरोग्य योजनांचा लाभ घेऊन आपले कुटुंब सुदृढ व निरोगी ठेवावे, असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण घोंगटे, सार्वजनिक आरोग्य परिचारिका शितल साखळीकर, विस्तार अधिकारी . शालिक गवई, जिल्हा रुग्णालयाच्या प्राचार्या श्रीमती मिना शेळके, तसेच रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, परिचारिका प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनी आणि आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.