यवतमाळ अर्बन बँक वणी शाखेचा 34 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

    दिनांक :12-Jul-2026
Total Views |
वणी, 
Yavatmal Urban Bank, Wani यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वणी शाखेचा 34 वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी बँकेचे अध्यक्ष डॉ. नितीन खर्चे यांनी बँक प्रथमच पूर्णपणे एनपीएमुक्त झाल्याचे सांगितले. यवतमाळ अर्बन बँक कोणत्याही व्यक्तीच्या मालकीची नसून भागधारकांचीच बँक आहे. प्रत्येक भागधारक या बँकेचा खरा मालक आहे, असे प्रतिपादन केले.
 
 
ytl bank
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वणी नप अध्यक्ष विद्या आत्राम होत्या. यावेळी विभागीय अध्यक्ष गोवर्धन राठोड व मार्गदर्शक म्हणून नगर संघचालक किरण बुजोणे यांची प्रमुख उपस्थिती होती. नप अध्यक्ष विद्या आत्राम यांनी, यवतमाळ अर्बन बँक ही सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था असून सेवाभाव हा तिच्या कार्याचा मुख्य आधार असल्याचे सांगितले. समाजहिताची भूमिका कायम ठेवत बँकेने केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांनी संचालक मंडळ व कर्मचाèयांचे अभिनंदन केले.
 
 
डॉ. नितीन खर्चे यांनी आपल्या भाषणात बँकेचा महाराष्ट्रभर विस्तार झाला असून आर्थिकदृष्ट्या बँक अधिक सक्षम झाल्याचे सांगितले. ग्राहकांचा व भागधारकांचा विश्वास हीच बँकेची खरी ताकद असल्याचे नमूद करीत भविष्यातही दर्जेदार, विश्वासार्ह व ग्राहकाभिमुख बँकिंग सेवा देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. विभागीय अध्यक्ष गोवर्धन राठोड यांनी वणी शाखेच्या कामकाजाचा आढावा घेत शाखेची सातत्यपूर्ण प्रगती आणि उत्कृष्ट आर्थिक स्थितीबद्दल समाधान व्यक्त केले. प्रमुख अतिथी किरण बुजोणे यांनी बँकेच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत उदयोन्मुख युवा व्यवसायिकांना भक्कम पाठबळ देणारी वित्तीय संस्था म्हणून यवतमाळ अर्बन बँकेने वेगळी ओळख निर्माण केल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन वणी शाखेचे व्यवस्थापक प्रमोद सप्रे यांनी, तर आभार अधिकारी अर्जुन उरकुडे यांनी मानले. कार्यक्रमाला बँकेचे पदाधिकारी, कर्मचारी, भागधारक व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.