जनतेच्या प्रश्नांपेक्षा समाज माध्यमांचीच अधिक काळजी !
विधानभवनाच्या पायèयांवर फोटो
पण सभागृहात जनतेचा आवाज किती बुलंद?
अमोल सांगानी
राळेगाव,
Monsoon Session of the State Legislature राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले की समाज माध्यमांवर एक वेगळीच स्पर्धा सुरू होते. पहिला आठवडा पहिला दिवस, दुसरा आठवडा पहिला दिवस, तिसरा आठवडा पहिला दिवस अशा मथळ्यांसह विधानभवनाच्या प्रवेशद्वारासमोर काढलेले छायाचित्र मोठ्या अभिमानाने प्रसिद्ध केले जाते. अनेक मंत्री, राज्यमंत्री, आमदार आणि विविध लोकप्रतिनिधी या छायाचित्रांच्या माध्यमातून आपण अधिवेशनात उपस्थित असल्याचा संदेश देतात. मात्र या सगळ्यात सामान्य नागरिकांच्या मनात एकच प्रश्न घुमत राहतो फोटो काढल्याने नेमके जनतेचे कोणते प्रश्न सुटतात ?
लोकांनी मत देऊन विधानभवनात पाठवले ते फोटो काढण्यासाठी नव्हे, तर त्यांच्या हक्कासाठी आवाज उठवण्यासाठी. सभागृहात ठाम भूमिका मांडणे, शासनाला जाब विचारणे, शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार युवक, महिला, विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर सरकारला उत्तर देण्यास भाग पाडणे, ही लोकप्रतिनिधींची खरी जबाबदारी आहे. पण अनेकदा या चमकदार पोस्ट पाहिल्यानंतर अधिवेशन हे कामाचे व्यासपीठ राहिले आहे की प्रसिद्धीचे ? असा प्रश्न पडतो. एका क्लिकमध्ये हजारो लोकांपर्यंत पोहोचता येते. पण जनतेला फोटोपेक्षा कामाचा पुरावा हवा आहे. तुमच्या पोस्टमध्ये विधानभवनाचा फोटो दिसतो, पण त्याचबरोबर तुम्ही किती प्रश्न विचारले, किती लक्षवेधी सूचना दिल्या, किती विकासकामांसाठी निधीची मागणी केली, किती वेळा आपल्या मतदारसंघाच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर धरले, याचाही हिशेब दिसला पाहिजे. कारण लोकशाहीत उपस्थितीपेक्षा कामगिरी महत्त्वाची असते.
आजही अनेक गावांमध्ये रस्ते नाहीत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे, शेतकèयांना हमीभाव मिळत नाही, बेरोजगारांच्या हाताला काम नाही, सरकारी रुग्णालयांची अवस्था बिकट आहे, शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे व विकासकामे रखडली आहेत. या प्रश्नांवर सभागृहात बुलंद आवाज उठवण्याऐवजी जर अधिवेशनाची ओळख केवळ आज विधानभवनात या छायाचित्रापुरती मर्यादित राहिली, तर ती लोकशाहीसाठी चिंतेची बाब आहे. लोकप्रतिनिधींनी छायाचित्रे टाकू नयेत, असा कोणाचाही आग्रह नाही. पण प्रत्येक फोटोसोबत कामाचाही ठोस हिशेब असला पाहिजे. आज कोणता प्रश्न मांडला?, सरकारकडून काय उत्तर मिळाले?, मतदारसंघासाठी कोणती मागणी केली?, काय निर्णय झाला? याची माहिती दिली, तरच त्या पोस्टला खरा अर्थ प्राप्त होईल.