पवन बॅडमिंटन अकादमीच्या स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

    दिनांक :12-Jul-2026
Total Views |
150 हून अधिक खेळाडूंचा सहभाग

वणी, 
Pawan Badminton Academy वणी शहरातील क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी ठरलेल्या पवन बॅडमिंटन अकादमीच्या वतीने आयोजित बॅडमिंटन स्पर्धेला शनिवार, 11 जुलै रोजी उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. 15 वर्षांखालील व खुल्या गटातील स्पर्धांमध्ये तब्बल 150 हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवत पहिल्याच दिवशी रंगतदार सामने खेळून प्रेक्षकांची मने जिंकली. स्पर्धेचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांच्या हस्ते झाले. यावेळी नगर परिषद अध्यक्ष विद्या आत्राम, मुख्याधिकारी सचिन गाडे, नियोजन सभापती लक्ष्मण उरकुडे, नगरसेवक अजय धोबेसह विविध सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
 
 
pawan
 
उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा देत नियमित क्रीडा स्पर्धांमुळे युवकांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती, शिस्त व निरोगी जीवनशैली रुजण्यास मदत होत असल्याचे सांगितले. शहरात क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी अशा स्पर्धा सातत्याने आयोजित होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. स्पर्धेत विविध गटांतील खेळाडूंमध्ये विजेतेपदासाठी चुरशीची लढत अपेक्षित असून, अंतिम विजेत्यांना रोख पारितोषिके व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेचे पंच म्हणून चैतन्य बोर्डे, श्लोक अग्रवाल, ईश्वर सोनटक्के व जयेश उमळे हे काम पाहत आहेत. स्पर्धेसाठी पवन बॅडमिंटन अकादमीचे पदाधिकारी व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.