Piraji Doiphode मानसिक आजारामुळे तब्बल 20 वर्षांपूर्वी कुटुंबापासून दुरावलेल्या परभणी जिल्ह्यातील पिराजी डोईफोडे यांचे नंददीप फाउंडेशनने उपचार व पुनर्वसन करून पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे त्यांच्या कुटुंबियांशी पुनर्मिलन घडवून आणले. यावेळी पिराजी यांच्या मुलीने आयुष्यात प्रथमच आपल्या वडिलांना प्रत्यक्ष पाहिल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले होते. सुमारे सहा महिन्यांपूर्वी यवतमाळ-आर्णी मार्गावरील जवळा गावाजवळ पिराजी अत्यंत दयनीय अवस्थेत आढळून आले होते. नंददीप फाउंडेशनचे संचालक संदीप शिंदे व त्यांच्या चमुने त्यांना पाहिले. त्यांना बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रात दाखल करून निवारा, भोजन व औषधोपचाराची व्यवस्था करण्यात आली.
मानसोपचार तज्ज्ञ डॉ. श्रीकांत मेश्राम यांच्या नियमित उपचारानंतर जवळपास सहा महिन्यांत पिराजी यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली. उपचारादरम्यान त्यांच्या बोलण्यातून परभणी जिल्ह्यातील काही गावांची नावे समोर आल्यानंतर पुनर्वसन चमुने त्यांच्या कुटुंबाचा शोध सुरू केला. पिराजींचा पत्ता शोधण्यासाठी चमुने सावरगाव, टाकळगाव, डोंगर पिंपळा, गंगाखेड, आष्टुर, चाटोरीसह आठ गावात चौकशी केली. अनेक दिवसांच्या शोधानंतरही ग्रामपंचायत सदस्य आकाश चव्हाण यांनी आपल्या संपर्काच्या माध्यमातून मदत केली. पिराजी यांचे चुलत भाऊ विक्रम डोईफोडे यांच्याशी संपर्क झाला.
विक्रम डोईफोडे यांनी पिराजी हे मागील वीस वर्षांपासून बेपत्ता असल्याची माहिती दिली. तसेच त्यांची पत्नी, मुलगा व मुलगी सध्या बांधकाम कामानिमित्त पुणे जिल्ह्यातील आळंदी परिसरात वास्तव्यास असल्याचे सांगितले. नंददीप फाउंडेशनच्या चमुने पिराजींना त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचविण्याचा निर्णय घेतला. मात्र त्या काळात पुणे परिसरात सुरू असलेला मुसळधार पाऊस व इंद्रायणी नदीने ओलांडलेली धोक्याची पातळी यामुळे आळंदी परिसरात जाणे कठीण झाले होते. अनेक अडचणी व प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत त्यांनी प्रवास पूर्ण केला. अखेर पिराजींना आळंदी येथे त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचविले.
कुटुंबीयांसमोर पिराजी उभे राहताच अत्यंत भावनिक वातावरण निर्माण झाले होते. विशेषतः त्यांची मुलगी अर्चना हिने आयुष्यात प्रथमच आपल्या वडिलांना प्रत्यक्ष पाहिले. अर्चनाला समज येण्यापूर्वीच पिराजी मानसिक आजारामुळे घरापासून दूर गेले होते. त्यामुळे आपले वडील कसे दिसतात, त्यांचा आवाज कसा आहे, याचीही तिला कल्पना नव्हती. तब्बल वीस वर्षांनंतर वडिलांना समोर पाहताच तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रूू वाहू लागले. पत्नी, मुलगा व मुलीने पिराजींचे स्वागत करत त्यांना स्वीकारले.