औद्योगिक क्षेत्रात शाश्वत, हरित ऊर्जेची लाट
नागपूर,
VNIT International Conference आजघडीला अनेक क्षेत्रांत स्वयंपूर्ण होत आहे. विश्वसनीय, कार्यक्षम आणि शाश्वत ऊर्जा यंत्रणा सुनिश्चित करीत नव्या भारताची उभारणी वेगाने होत आहे. औद्योगिक क्षेत्रात शाश्वत आणि हरित ऊर्जेची लाट आली असल्याचे स्पष्ट प्रतिपादन युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ फ्लोरिडाचे संचालक प्रा. डी. योगी गोस्वामी यांनी केले.
व्हीएनआयटीच्या विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या वतीने व्हीएनआयटीच्या सभागृहात आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचे प्राध्यापक प्रा. महेश कृष्णमूर्ती, प्रा. मोहम्मद नासीरउद्दीन, प्रा. नासीरउद्दीन, डॉ. रमशा करमपुरी आदींची उपस्थिती होती. "द गोस्वामी सायकल" ही संकल्पना मांडण्यासाठी प्रा. डी. योगी गोस्वामी प्रसिद्ध आहेत. ही संकल्पना पॉवर सायकल आणि कूलिंग सायकल यांचे संयोजन असून, उद्योगांमध्ये शाश्वत ऊर्जा कार्यप्रणाली विकसित करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे.
इलेक्ट्रिक ट्रान्सपोर्ट हेच शाश्वत आणि प्रदूषणमुक्तीचे भविष्य राहणार असल्याने केंद्र व राज्य सरकार (ईव्ही) धोरणानुसार, २०३० पर्यंत ८० टक्के गाड्या इलेक्ट्रिक असाव्यात हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विश्वेश्वरैया राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत विविध चर्चासत्रांत देश-विदेशातील ५६० शोधनिबंध सादर करण्यात आले. परिषदेत जगभरातील प्रमुख संशोधक, शिक्षक, उद्योगतज्ज्ञ, धोरणकर्ते आणि विद्यार्थी यांनी एकत्र येत सस्टेनेबल एनर्जी आणि भविष्यातील इलेक्ट्रिक वाहतुकीतील घडामोडींवर चर्चा केली.
प्रा. कृष्णमूर्ती यांनी बॅटरी व्यवस्थापन प्रणालीमधील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांचे संशोधन ग्रामीण विद्युतीकरणासाठी "सेकंड लाईफ बॅटरीज" च्या वापराला प्रोत्साहन देण्यावर केंद्रित आहे. चर्चासत्राच्या यशस्वितेसाठी व्हीएनआयटीचे संचालक प्रा. प्रेमलाल पटेल, प्रा. माधुरी चौधरी, प्रा. यशवंत कटपटाल, प्रा. मकरंद बल्लाळ, प्रा. मंगेश कोटमकर, प्रा. अर्घ्य मित्रा, प्रा. प्रकाश कुळकर्णी, भाग्यश्री मुसळे आदींनी परिश्रम घेतले.