अध्यक्ष महेश सोनेकर : कर्जावरील व्याजदरात ही झाली कपात
यवतमाळ,
Zilla Parishad Employees' Credit Society' यवतमाळ जिप कर्मचारी सहकारी पतसंस्थेने 2025-26 या आर्थिक वर्षात 6 कोटी 70 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळविला आहे. तसेच सभासदांच्या हिताचा विचार करून गृहकर्जावरील वार्षिक व्याजदर 9 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय संचालक मंडळाने घेतल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष महेश सोनेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुढे बोलताना सोनेकर म्हणाले, 61 वर्षांपासून सातत्याने प्रगती करणाèया पतसंस्थेला यंदाही ‘अ’ दर्जाचे लेखापरीक्षण प्राप्त झाले. सध्या संस्थेचे 10 हजार 725 सभासद आहे. त्यांना अधिक सुलभ, विश्वासार्ह आर्थिक सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे.
संस्थेकडून सभासदांना 50 लाख रुपयांपर्यंत गृहकर्जाची सुविधा उपलब्ध असून अर्जानंतर तातडीने कर्जाची रक्कम बँक खात्यात जमा केली जाते. आतापर्यंत संस्थेने 237 कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. संस्थेचे भागभांडवल 33 कोटी 96 लाख रुपये, राखीव निधी 49 कोटी रुपये, तर ठेवी 340 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. विविध बँकांमध्ये 180 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. यवतमाळ, दारव्हा, पुसद व वणी येथे संस्थेची स्वमालकीची सुसज्ज कार्यालये आहे. आर्णी व पांढरकवडा येथे शाखा कार्यरत आहेत. संस्थेत सर्वसामान्य नागरिकांनाही ठेवी ठेवण्याची सुविधा आहे. ठेवींवर कमाल 10 टक्के व्याजदर दिला जात आहे.
संस्थेकडून दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वृक्षसंवर्धन, दुर्धर आजारांसाठी आर्थिक मदत उपक्रम राबविले जाते. आर्थिक वर्षात 26 सभासदांना 3 लाख 60 हजार रुपयांची मदत देण्यात आली.
‘सभासद कुटुंब आधार योजना’ अंतर्गत 18 मृत सभासदांच्या वारसांना प्रत्येकी 6 लाख रुपये, तर डीसीपीएसधारक 10 सभासदांच्या वारसांना प्रत्येकी 12 लाख रुपये अशा एकूण 2 कोटी 28 लाख रुपयांचे वितरण करण्यात आले. अपघाती विमा योजनेअंतर्गत एका सभासदाच्या वारसाला 30 लाख रुपयांचा विमा दावा मंजूर करण्यात आला. सभासदांना अधिक वेगवान व डिजिटल सेवा देण्यासाठी आरटीजीएस, एनईएफटी, नेट बँकिंग, मोबाईलद्वारे खाते व कर्जाची माहिती तसेच ऑनलाइन आर्थिक व्यवहारांची सुविधा सुरू करण्यात आली आहे.
आगामी काळात व्यवसायवृद्धी, डिजिटल सेवांचा विस्तार, आर्थिक शिस्त आणि सभासदाभिमुख योजनांवर विशेष भर दिला जाणार असल्याचे अध्यक्ष सोनेकर यांनी स्पष्ट केले. यावेळी उपाध्यक्ष संजय गावंडे, संजय बिहाडे, मुकेश भोयर, शरद घारोड, विनोदकुमार कदम, अशोक चटप, गजानन पोयाम, तुषार आत्राम, नदिम पटेल, प्रदीप मोहटे, अभिजीत ठाकरे, स्वप्नील फुलमाळी, विलास टोंगे, सचिन ठाकरे, तेजस तिवारी, सुनिता गुघाणे, विजया राऊत तसेच सरव्यवस्थापक मारोती राजगडकर उपस्थित होते.