अनिल कांबळे,
नागपूर,
police-crime-branch : शहरातील गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवणाऱ्या नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेत लवकरच मोठे बदल होणार आहेत. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी गुन्हे शाखेची कार्यपद्धती पारदर्शक, कार्यक्षम आणि परिणामकारक करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यांतर्गत अनेक वर्षांपासून गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या ‘रिपीटर्स’ आणि अवैध वसुलीच्या आरोपाखाली चर्चेत असलेल्या कर्मचाऱ्यांना बाजूला करून नव्या दमाच्या पोलिस कर्मचाऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गुन्हे शाखा ही शहर पोलिस दलातील अत्यंत महत्त्वाची शाखा मानली जाते. खून, दरोडे, जबरी चोरी, आर्थिक गुन्हे, संघटित गुन्हेगारी यांसारख्या क्लिष्ट गुन्ह्यांचा तपास करण्याबरोबरच शहरातील अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारीही या शाखेकडे असते. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये या शाखेचा कायमच धाक राहिला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत गुन्हे शाखेत काही कर्मचारी अनेक वर्षे कायम राहिल्याने त्यांच्यावर अवैध वसुलीचे आरोप झाले. काही कर्मचारी ‘पैसे कलेक्टर’ म्हणून ओळखले जाऊ लागल्याने गुन्हे शाखेची प्रतिमा मलिन झाली होती. त्यामुळे गुन्हे शाखेत नियुक्ती मिळविण्यासाठीही काही कर्मचारी विविध मार्गांचा अवलंब करीत असल्याची चर्चा पोलिस दलात होती. ही बाब पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी गुन्हे शाखेच्या रचनेत बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, ज्या पोलिस कर्मचाऱ्यांनी यापूर्वी गुन्हे शाखेत कधीही काम केलेले नाही, अशांनाच प्राधान्य देण्यात येणार आहे. नव्या कर्मचाऱ्यांना संधी मिळणार असून, कामकाजात अधिक पारदर्शकता आणि जबाबदारी येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गुन्हे शाखेसाठी करा अर्ज
या प्रक्रियेअंतर्गत पोलिस उपायुक्त (गुन्हे) दीपक अग्रवाल यांनी इच्छुक पोलिस कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागविले आहेत. गुन्हे शाखेत रुजू होण्यास तयार असलेल्या कर्मचाऱ्यांनी गुन्हे शाखेच्या आवक-जावक विभागात अर्ज सादर करावेत, अशी सूचना देण्यात आली आहे. प्राप्त अर्जांची छाननी करून उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार असून, त्यानंतर अंतिम निवड केली जाणार आहे.