महागाव,
aarti-phupate : वर्धा येथील अल्पवयीन बालिकेच्या मृत्यूच्या अत्यंत दुर्दैवी संतापजनक व मानवतेला काळिमा फासणाèया घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली असून शासनाने विशेष तपास पथक स्थापन करून जलदगती न्यायालयात खटला चालवण्याचा निर्णय घेतला.
या पृष्ठभूमिवर भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांनी महागाव तालुक्यातील नगरवाडी येथे जाऊन पीडित बालिकेच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांचे दुःख समजून घेत त्यांना धीर दिला. या कठीण प्रसंगी भाजपा व आपण वैयक्तिकरित्या त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असा विश्वास दिला.
यावेळी डॉ. फुपाटे यांनी या प्रकरणाचा निष्पक्ष, पारदर्शक व जलद तपास करून दोषींवर कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळावा व अशा अमानुष घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शासनाने अधिक प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी ठाम मागणी केली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनीही पीडित कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांच्या न्यायाच्या लढ्यात पूर्ण सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. लेकींच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड मान्य नाही. प्रत्येक पीडितेला न्याय आणि प्रत्येक दोषीला कठोर शिक्षा मिळालीच पाहिजे, हीच समाजाची अपेक्षा आहे.