देवीदास चव्हाण हत्याकांड प्रकरणी चौघांना जन्मठेप

    दिनांक :21-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
devidas-chavan-murder-case : देवीदास उर्फ देवा निरंजन चव्हाण हत्याकांड प्रकरणी तब्बल सहा वर्षांनंतर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत चारही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एएल यावलकर यांनी 21 जुलै रोजी हा निकाल दिला. आरोपींना भारतीय दंड विधानाच्या कलम 302 कलम 34 अंतर्गत दोषी ठरवत प्रत्येकी जन्मठेपेची सश्रम कारावासाची शिक्षा तसेच प्रत्येकी 2 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
 
 
j
 
 
 
या प्रकरणातील आरोपी सिध्दार्थ रामदास वानखेडे (वय 40), दीपक राममनोहर यादव (वय 40), सिध्दांत उर्फ हेमंत राजेश रावेकर (वय 35) व अजय धर्माजी वासनिक (वय 30) हे सर्व देवीनगर, लोहारा, ता. जि. यवतमाळ येथील रहिवासी आहेत. लोहारा पोलिस ठाण्यात अपराध क्रमांक 108/2020 अन्वये त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
 
 
26 ऑगस्ट 2020 रोजी दुपारी दीड ते दोनच्या सुमारास मृतक देवीदास उर्फ देवा निरंजन चव्हाण हे कर्जाची रक्कम भरून घरी परतत होते. यवतमाळ-लोहारा मार्गावरील एका शोरूमजवळ आरोपींनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. प्रथम सिध्दार्थ वानखेडे याने अल्टो कारने धडक दिल्याने ते खाली पडले. त्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना दीपक यादव याने आपल्या वाहनाने पुन्हा धडक दिली. त्यानंतर सिध्दांत रावेकर याने धारदार शस्त्राने गळ्यावर वार केले, तर अजय वासनिक याने चाकूसदृश शस्त्राने हल्ला केला. त्यानंतर सिध्दार्थ वानखेडे यानेही चाकूने वार केल्याचा आरोप होता. हल्ल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
 
 
या प्रकरणी शरद बेंद्रे यांच्या तक्रारीवरून लोहारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास अधिकारी तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक सचिन लुले, तसेच पोलिस उपनिरीक्षक संतोष जायभाय यांनी सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
 
 
खटल्यादरम्यान सरकारी पक्षाने एकूण सात साक्षीदार तपासले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, तक्रारदार, तपास अधिकारी तसेच अन्य साक्षीदारांच्या साक्षी व न्यायालयासमोर सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपींविरुद्धचा गुन्हा सिद्ध झाल्याचे नमूद केले.
 
 
या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील अ‍ॅड. यूके पांडे यांनी कामकाज पाहिले. तक्रारदार पक्षास सहायक म्हणून अ‍ॅड. समीर गावंडे व अ‍ॅड. राजवर्धन गाडे यांनी सहकार्य केले. तपास प्रक्रियेत सहायक पोलिस उपनिरीक्षक जगदीश भगत यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.