तभा वृत्तसेवा
राळेगाव,
free-medical-treatment : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राळेगाव तालुक्यातील जळका येथे दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) व डॉ. कुणाल बाबाराव भोयर मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्वरोग निदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एकाच दिवशी 900 हून अधिक रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांना आवश्यक उपचार, औषधे व विविध वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
आरोग्य शिबिराचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, भाजपा यवतमाळ जिल्हाध्यक्ष अॅड. प्रफुल्लसिंह चौहान तसेच भाजपा राळेगाव तालुका अध्यक्ष छाया पिपरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. शिबिरात नेत्ररोग, अस्थिरोग, मेडिसीन, शल्यचिकित्सा, बालरोग, स्त्रीरोग, त्वचारोग, दंतरोग, कान-नाक-घसा व क्षयरोग अशा विविध विभागातील 20 हून अधिक तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली.
मोफत औषधांसह रक्त, लघवी, ईसीजी, एक्सरे यांसारख्या तपासण्या तसेच आयुष्मान भारतकार्ड मोफत काढून देण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. दुर्गम भागातील नागरिकांसाठी मोफत वाहन व्यवस्थेमुळे अनेक गरजू रुग्णांना या शिबिराचा लाभ घेता आला.
डॉ. कुणाल भोयर : डॉक्टर नव्हे, मानवतेचे खरे शिलेदार
या शिबिरातील सर्वात भावनिक आणि प्रेरणादायी क्षण म्हणजे डबल सिकलसेल आजाराने ग्रस्त आदित्य उईके या चिमुकल्यासाठी डॉ. कुणाल भोयर यांनी घेतलेला मोठा निर्णय. आदित्यच्या उपचारांचा खर्च, शिक्षण व पालनपोषणाची संपूर्ण जबाबदारी स्वतः स्वीकारण्याची घोषणा त्यांनी केली. त्यांच्या या निर्णयाने उपस्थितांचे डोळे पाणावले आणि सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले.
यावेळी अशोक उईके यांनी, डॉ. कुणाल भोयर यांच्यासारखे डॉक्टर समाजासाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांनी आरोग्यसेवेला समाजसेवेचे रूप दिले असून अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे, असे गौरवोद्गार काढले.
अॅड. प्रफुल्लसिंह चौहान यांनी, हा उपक्रम समाजहिताचा आदर्श नमुना असल्याचे सांगितले. संचालन रणधीर किनाके यांनी केले. यावेळी भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.