तभा वृत्तसेवा
उमरखेड,
accident : उमरखेड-बाळदी मार्गावर सोमवारी मध्यरात्री झालेल्या भीषण दुचाकी अपघातात बाळदी येथील 28 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवार, 21 रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे बाळदी गावावर शोककळा पसरली आहे.
वैभव संभाजी मिराशे (वय 28, बाळदी, ता. उमरखेड) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवक पुसद एसटी महामंडळाच्या वर्कशॉपमध्ये मेकॅनिकल कर्मचारी म्हणून कार्यरत होता. सोमवारी रात्री सुमारे 11 च्या सुमारास ते एमएच29 सीएस0160 क्रमांकाच्या दुचाकीने उमरखेडहून बाळदीकडे जात होते.
दरम्यान उमरखेडबाळदी मार्गावर अज्ञात कारणामुळे त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. अपघातात वैभव यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. रात्री उशिरा हा अपघात झाल्याने मदत वेळेवर मिळू शकली नाही. मंगळवारी सकाळी या मार्गावरून जाणाèया नागरिकांच्या निदर्शनास अपघातग्रस्त युवक आल्याने त्यांनी तत्काळ उमरखेड पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर सकाळी सुमारे 6 च्या दरम्यान वैभव यांना उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाèयांनी तपासणीअंती त्यांना रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत घोषित केले. मृतदेहाचे शवविच्छेदन उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले आहे.
या प्रकरणी मृतकाचे काका मोतीराम यादव मिराशे यांनी उमरखेड पोलिस ठाण्यात माहिती दिली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास पोलिस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनात बीड जमादार दिलीप चव्हाण करीत आहेत.
मृतकाच्यामागे आई-वडील, बहीण असा परिवार आहे.