फ्रेंड्स शोरुममध्ये कपडे बदलताना काढला व्हिडिओ

- आरोपी नोकराला तीन वर्षे सश्रम कारावास

    दिनांक :21-Jul-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर, 
crime-news : सीताबर्डीतील फ्रेंड्स या कपड्याच्या दुकानात ट्रायल रूममध्ये नोकराने मोबाईल लपवला आणि एका अभियांत्रिकेच्या एका विद्यार्थिनीचे कपडे बदलताना व्हिडिओ काढले. हा प्रकार मुलीच्या लक्षात आल्यानंतर या प्रकरणी दुकानाच्या मालकासह दोघांवर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी न्यायालयाने आरोपी नोकराला तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश, नागपूर, पी. जे. मोडक यांनी आज मंगळवारी हा निकाल दिला. निखिल ऊर्फ पिंटू दीपक चौथमल (वय २७,आंबेडकरनगर, पाचपावली) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४(क), पोक्सो कायद्याच्या अंतर्गत दोषी ठरविले. आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास तसेच एकूण चार हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास तीन महिन्यांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे.
 
 
 
crime-news
 
 
ही घटना १० ऑगस्ट २०१९ रोजी सायंकाळी सुमारे ७.४५ वाजता सीताबर्डी मार्केट परिसरातील फ्रेंड्स या कपड्याच्या दुकानात घडली होती. अभियांत्रिकेच्या प्रथम वर्षाला शिकणारीऱ्या १७ वर्षीय मुलगी आपल्या मैत्रिणीसोबत युनिफॉर्म खरेदी करण्यासाठी फ्रेंड्स दुकानात गेली होती. ती ट्रायल रूममध्ये गेल्यानंतर आरोपी निखिल चौथमल याने आपला मोबाईल फोन रुममध्ये लपवून ठेवला होता. त्या फोनने तो मुलींचे अश्लील व कपडे बदलतानाचे आक्षेपार्ह चित्रीकरण करीत होता. कपडे बदलत असताना त्या मुलीला संशय आल्याने तिने शोध घेतला असता मोबाईल मिळून आला. या घटनेनंतर पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिस ठाण्यात निखिल चौथमल आणि दुकान मालक किसन इंदरचंद अग्रवाल (वर्धमानगर) या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला त्याच दिवशी अटक केली होती. तत्कालीन तपासी अधिकारी शुभदा संखे यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यादरम्यान सादर करण्यात आलेल्या साक्षी-पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीवरील गुन्हा सिद्ध झाल्याचे मान्य करून त्याला शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे अॅड. आसावरी परसोडकर यांनी काम पाहिले, तर आरोपीतर्फे अॅड. वाय. बी. मंडपे यांनी बाजू मांडली. कोर्ट पैरवी अधिकारी हवालदार किरण कैथल आणि मिनल लोणारे यांनी न्यायालयीन कामकाजात सहकार्य केले.