वस्तू तरंगत होत्या... गाळ उपसण्यातच रात्र सरली!

-स्वावलंबी नगरवासीयांची रात्र वैऱ्याची -शेकडो घरांत नाल्याचे पाणी; लाखो रुपयांचे नुकसान -धान्य, इलेक्ट्रॉनिक साहित्य, फर्निचर उद्ध्वस्त -रोगराईची भीती वाढली

    दिनांक :29-Jul-2026
Total Views |
नागपूर, 
nagpur-news : मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास पावसाचा जोर वाढला आणि काही कळायच्या आत रस्ते पाण्याखाली गेले. काही मिनिटांतच नाल्याचे पाणी घरांत शिरले. स्वतःचा जीव वाचवायचा की घरातील सामान, असा प्रश्न पडला होता. घरातील वस्तू अक्षरशः पाण्यावर तरंगत होत्या. जर हाच विकास असेल, तर असा विकास आम्हाला नको, अशा शब्दांत स्वावलंबीनगरातील प्रोसेस सर्व्हर सोसायटीचे रहिवासी चंद्रहास मुळे यांनी संताप व्यक्त केला.
 
 
 
swawlambi-nagar-1
 
 
मंगळवारी अवघ्या तीन तासांच्या मुसळधार पावसाने महापालिकेच्या पावसाळी तयारीचे दावे ‘पाण्यात’ गेले. स्वावलंबीनगरातील नाल्याला आलेल्या पुरामुळे परिसरातील सुमारे १०० ते १५० घरांमध्ये घाण पाणी शिरले. अचानक आलेल्या पाण्यामुळे रहिवाशांची अक्षरशः धावपळ झाली. नाल्याचे पाणी घरांमध्ये शिरल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आणि घरातील धान्य, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक साहित्य, गाद्या, कपडे यांचे मोठे नुकसान झाले.
 
 
परिसरातील मुख्य मार्गावरील युको बँकेलाही या पुराचा फटका बसला. बँकेमध्ये तब्बल अडीच फूट पाणी साचल्याने संगणक, एटीएम यंत्रणा आणि अन्य साहित्याचे नुकसान झाले. शाखा व्यवस्थापक ब्रजेश चक यांनी काही महत्त्वाची कागदपत्रे थोडक्यात वाचली असली तरी शाखेचे अन्यत्र स्थलांतरण करण्याची मागणी यापूर्वीच करण्यात आल्याचे सांगितले.
 
याच मार्गावरील राहुल दहेले यांच्या ओम साई किराणा आणि शुभम दहेले यांच्या श्री साई कृपा या दुकानांमध्ये पाणी शिरल्याने धान्य, किराणा, फ्रीजसह मोठ्या प्रमाणावर साहित्य खराब झाले. मनीष मोहरील यांच्या घरातील तीन लॅपटॉप, टॅबलेट, फर्निचर, गाद्या, कपडे आणि सोफ्याचे नुकसान झाले. घरालगतच्या यश कलेक्शनमध्येही पाणी शिरून सुमारे पाच लाख रुपयांचे कपडे खराब झाल्याची माहिती आहे.
 
 
परिसरातील रहिवासी प्रकाश कागभट म्हणाले, गेल्या ३५ वर्षांपासून प्रत्येक पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होते. वारंवार तक्रारी करूनही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. परिसरातील प्रसन्न देशमुख, उमेश कुबडे, डॉ. मनोहर रेवतकर, सुनील तिवारी, प्रभाकर तितरे, भास्कर तितरे, शेखर श्रीखंडे, रामजी ठाकूर, चंद्रहास मुळे यांच्यासह अनेक कुटुंबांच्या घरांतील साहित्याचे मोठे नुकसान झाले असून महापालिकेच्या निष्क्रियतेविरुद्ध नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
स्वावलंबीनगर होते जागे
 
घरांमध्ये शिरलेले पाणी हे पावसाचे नसून नाल्याचे असल्याने त्यासोबत मोठ्या प्रमाणात गाळही घरात साचला. पाणी ओसरल्यानंतर संपूर्ण रात्र नागरिकांनी घरातील गाळ, चिखल आणि कचरा साफ करण्यात घालवली. अनेक घरांच्या भिंतींवर पाण्याची उंची स्पष्टपणे दिसून येत आहे.
 
 
नगरसेवकांना तुम्ही पाहिले का?
 
 
पूरग्रस्त नागरिकांना मदतीची अपेक्षा असताना परिसरातील एकही नगरसेवक घटनास्थळी फिरकला नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. रात्रभर हालअपेष्टा सहन करणाऱ्या नागरिकांकडे लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवल्याचा आरोप करीत, यासाठीच आम्ही त्यांना निवडून दिले का, असा संतप्त सवाल रहिवाशांनी उपस्थित केला.
विहिरी, पाण्याचे टाकेही दूषित; साथीच्या रोगांचा धोका
 
नाल्याचे घाण पाणी परिसरातील विहिरी आणि पाण्याच्या टाक्यांमध्ये शिरल्याने पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. अद्याप टाके आणि विहिरी स्वच्छ करता आल्या नसल्याने साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. महापालिकेने विहिरी व टाके स्वच्छ करून निर्जंतुकीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.