आ. सुलभा खोडकेंचा औचित्याचा मुद्दा
अमरावती,
Birth and Death Certificate Case अमरावती महापालिकेमध्ये जन्म -मृत्यू प्रमाणपत्रांचे हजारो अर्ज प्रलंबित असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये असंतोष निर्माण होत असल्याच्या पृष्ठभूमीवर अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच शहरात जन्म-मृत्यू प्रमाणपत्र वितरण प्रणाली अधिक सुलभ व सोयीची करण्यासाठी जन्म-मृत्यू प्रमाणपत्राच्या प्रलंबित प्रकरणांचा झोनस्तरावर निपटारा करण्याची सूचना त्यांनी सभागृहासमक्ष केली आहे.
आ. सुलभा खोडके यांनी सभागृहाला अवगत केले की, सध्या विद्यार्थ्यांच्या शाळा व महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांची शासकीय कागदपत्रांसाठी लगबग दिसून येत आहे. आधारकार्डसाठी आणि शासकीय कागदपत्रे काढण्यासाठी जन्म-मृत्यू दाखल्यांची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. परंतु शासनाच्या सीआरएस संगणकीय प्रणालीवर दरमाह केवळ दोन हजार दाखले देण्याची जाचक मर्यादा लादण्यात आल्याची अत्यंत गंभीर बाब जून २०२६ मध्ये समोर आली आहे. नवीन सॉफ्टवेअरमधील तांत्रिक अडचणी तसेच जिल्हा निबंधक-उपनिबंधक यांच्या लॉगिन आयडीवरून जन्म-मृत्यू दाखले वितरित केले जात आहेत. शासनाच्या नगरविकास विभागाकडून अद्यापही मनपा झोन स्तरावरील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सीआरएस संगणकीय प्रणाली वापरण्यासंदर्भात लॉगिन आयडी व पासवर्ड उपलब्ध करून दिला नसल्याने केवळ झोनस्तरावर अर्ज स्वीकारून ते मुख्यालयाकडे वर्ग करावे लागत आहेत. या प्रक्रियेमुळे व तांत्रिक अडचणीमुळे जन्म-मृत्यू प्रमाणपत्र वितरणाची गती कमालीची मंदावली आहे, याबाबत आमदारांनी सभागृहाचे लक्ष वेधले.