दर्यापूर पालिकेच्या आढावा बैठकीत खडाजंगी

    दिनांक :03-Jul-2026
Total Views |
शिवसेना पक्षनेते आक्रमक
 
दर्यापूर, 
Daryapur Municipality दर्यापूर पालिकेच्या आढावा बैठकीत जोरदार खडाजंगी झाली. शिवसेनेचे नगरसेवक प्रदीप मालिये यांनी शहरातील अव्यवस्थेवर प्रशासनाला खडे बोल सुनावले. त्यामुळे बैठकीतील वातावरण तणावाचे झाले होते. शहरात पसरलेली घाण, नाल्या स्वच्छता, कचरा तथा रस्त्यावरील खड्डे इत्यादी विषयांवर ते आक्रमक झाले होते. यावेळी बैठकीत काँग्रेस, शिवसेना, राकाँ, भाजपाचे नगरसेवक उपस्थित होते.
 
 
Daryapur Municipality
 
नगरपरिषद कार्यालयात मासिक आढावा सभा आयोजित केली होती. या सभेत नगराध्यक्ष नलिनी भारसाकळे, मुख्याधिकारी डॉ. विकास खंडारे व सर्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. सभेमध्ये शिवसेना शिंदे गटाचे पक्षनेते व नगरसेवक प्रदीप गोपाल मलिये यांनी गावातील अनेक समस्यांवर आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी शहरातील सतत वाढत्या रोगराईसाठी स्वच्छता व्यवस्था कमकुवत असल्याने आरोग्य विभागास जबाबदार धरले. संसर्गजन्य आजार हे सतत वाढत आहेत, तरी आरोग्य विभाग काय करीत आहे, असा प्रश्न जनतेला पडला आहे. जनतेला काय उत्तर द्यावे, असा सवाल त्यांनी केला. कचरा संकलन गाड्या नियमित सेवा देतील व कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी कचरा राहणार नाही, असे तोंडी आश्वासन आरोग्य विभागाने दिले आहे. शहरात जागोजागी पथदिवे बंद असल्याची तक्रार होत आहे.
 
 
 
पावसाच्या पाण्यामुळे जमिनीत बिळात राहणारे साप, विंचू व किडे बाहेर पडले आहेत. महिलांना जीव मुठीत घेऊन अंधारात घराबाहेर पडावे लागते. असे असून देखील कोणतीही सकारात्मक कार्यवाही होत नसल्याने त्यांनी विद्युत विभागाला विचारणा केली. कार्यवाही न झाल्यास शिवसेना शिंदे गटातर्फे नगरविकास मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना लेखी तक्रार केली जाईल, असे मालिये यांनी सांगितले येत्या आठवड्यात कार्यवाही न दिसल्यास बेशरमचे पुष्पगुच्छ देऊन, त्यानंतर पुष्पहार देऊन सत्कार केला जाईल, असा अल्टिमेटम दिला आहे. दखल घेतली गेली नाही तर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असे प्रदीप मालिये यांनी सांगितले .