गुरुकुंज उपसा सिंचन टप्पा दोन मंजूर

    दिनांक :03-Jul-2026
Total Views |
‘त्या’ १२ गावांतील शेतकऱ्यांना दिलासा
४ हजार हेक्टर जमिनीचे सिंचन होणार
तिवसा, 
gurukunj upasa sinchan तिवसा विधानसभा मतदारसंघातील गुरुकुंज उपसा सिंचन योजना टप्पा-२ ला मान्यता देण्यात आली आहे. सिंचनापासून वंचित राहिलेल्या वऱ्हा सर्कलमधील १२ गावांना त्याचा लाभ होणार आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये औचित्याच्या मुद्दाद्वारे आमदार राजेश वानखडे यांनी शासनाकडे सदर योजना मंजूर करण्याची आग्रही मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला मोठे यश मिळाले असून शासनाने गुरुकुंज उपसा सिंचन योजना भाग-२ कार्यान्वित करण्यासाठी मान्यता दिलेली आहे. जलसंपदा विभागाच्या सचिवांनी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना पत्राद्वारे तसे कळविले आहे.
 
 
wankede
 
अत्यंत सुरुवातीच्या काळापासून या वंचित १२ गावांतील शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी मिळावे यासाठी आमदार राजेश वानखडे शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न करीत आहेत. या १२ गावांना वैनगंगा नळगंगा प्रकल्पांतर्गत मार्डी तलावावरून सिंचन सुविधा देण्याचे प्रस्तावित होते. परंतु, इतका मोठा अजस्त्र प्रकल्प, त्याला पूर्ण होण्यासाठी लागणारा मोठा कालावधी पाहता या अनुषंगाने या १२ गावांना अप्पर वर्धा धरणाच्या उजव्या कालव्यावरूनच वाढीव उपसा सिंचन योजनेद्वारे लवकरात लवकर सिंचनाचा लाभ देण्याबाबत आ. वानखडे आग्रही होते. त्यांच्या मागणीला यश आले आहे. भविष्यात ही योजना पूर्णत्वास जाऊन पहिल्या टप्प्यात वंचित राहिलेले या १२ गावांतील अंदाजे चार हजार हेक्टरच्या वर जमीन सिंचनाखाली येणार आहे. सदर योजनेतून वऱ्हा, जावरा, विष्णोरा, मालधुर, सालोरा, धोत्रा, माळेगाव, शेंदोळा, शिरजगाव यांसह परिसरातील एकूण १२ गावांना लाभ होणार आहे. योजनेला मान्यता दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले आहे.