आराध्य कोरडे, आर्यन बेलसरे उच्च शिखरावर

    दिनांक :03-Jul-2026
Total Views |
हिमालयात १४,१०० फूट गाठली उंची
 
वरुड, 
Himalayas: Humpta Pass Trek शहरातील साहसी युवा आराध्य कोरडे आणि आर्यन बेलसरे यांनी हिमाचल प्रदेशातील समुद्र सपाटीपासून १४,१०० फूट (४,२९८ मीटर) उंचीवरील प्रसिद्ध हंप्टा पास ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण करून वरुडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. कुल्लू आणि लाहौल खोऱ्यांना जोडणारा सुमारे २८ किलोमीटरचा हा ट्रॅक पाच दिवसांत पूर्ण करण्यात आला. मनाली येथून सुरू झालेल्या या साहसी मोहिमेत जॉब्रा, चिका, बलू का घेरा, हंप्टा पास, शिया गोरू आणि छत्रू असा खडतर प्रवास करीत दोघांनी हिमालयाच्या कुशीत अविस्मरणीय अनुभव घेतला आहे. ट्रॅकदरम्यान कमी ऑक्सिजन, गोठवणारी थंडी, सतत बदलणारे हवामान, बर्फाच्छादित चढाई,
 
 
adsdsds
 
हीम नदीवरील प्रवाह आणि कठीण पर्वतीय मार्ग अशा अनेक आव्हानांचा त्यांनी धैर्याने सामना केला. १४,१०० फूट उंचीवरील हंप्टा पास ट्रॅक सर केल्यानंतर कुल्लू खोऱ्यातील हिरवाईतून लाहौलच्या रुक्ष आणि बर्फाच्छादित प्रदेशात होणारा निसर्गाचा अद्भूत बदल अनुभवण्याची संधी त्यांना मिळाली. या मोहिमेदरम्यान त्यांनी हिमालयातील प्रसिद्ध चंद्रताल सरोवरालाही भेट दिली. निळेशार पाणी, बर्फाच्छादित पर्वतरांगा आणि निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य यामुळे हा प्रवास त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव ठरला. आराध्य कोरडे आणि आर्यन बेलसरे यांच्या या यशस्वी साहसी मोहिमेमुळे वरुड शहराच्या नावात आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल मित्रपरिवार, नागरिक तसेच विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या या यशामुळे इतर युवकांनाही गिर्यारोहण, साहसी पर्यटन आणि निसर्ग संवर्धनाची प्रेरणा मिळत आहे.