आणखी दोन आरोपी गजाआड
८३.३६ कोटींचे व्यवहार उघड
अमरावती,
Interstate cyber scam काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यात सायबर घोटाळ्याचे एक मोठे प्रकरण उघकीस आले होते. यात १२ आरोपींना अटक करण्यात आली होती. याच प्रकरणात आणखी दोन आरोपींना पकडण्यात आले असून यातून ८३ कोटी ३६ लाख ११ हजार १३४ रुपयांचे व्यवहार उघडकीस आले आहेत. जिल्ह्यामध्ये गरीब व मजूर वर्गातील नागरिकांच्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्या नावाने बँक खाती उघडण्यास प्रवृत्त करण्यात येत होते.
त्यानंतर संबंधित व्यक्तींकडून बँक पासबुक, एटीएम कार्ड, आधार लिंक मोबाईल क्रमांक व इतर आवश्यक कागदपत्रे ताब्यात घेऊन त्या बदल्यात किरकोळ मोबदला देण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. अशाप्रकारे प्राप्त झालेल्या बँक खात्यांचा वापर सायबर फसवणूक, ऑनलाईन गेमिंग व इतर बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांसाठी करण्यात येत असल्याच्या तक्रारी पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने मोर्शी तालुक्यातील शिरखेड पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास अमरावती ग्रामीण सायबर पोलिस विभागाकडे सोपविण्यात आला आहे.
गुन्ह्याच्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषण, आर्थिक व्यवहारांची पडताळणी तसेच गुप्त माहितीच्या आधारे यापूर्वी १२ आरोपींना अटक करण्यात आली होती. सदर गुन्ह्याच्या पुढील तपासादरम्यान फरार आरोपींचा शोध घेत असताना आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी राकेश झामनानी याला ३० जूनला अटक करण्यात आली. रामपुरी कॅम्प परिसरातील माधवनगर येथील विजय महेशलाल झामनानी याला १ जुलैला अटक करण्यात आली. या गुन्ह्याच्या तपासामध्ये आतापर्यंत एकूण ६२ बँक खात्यांचा तपास करण्यात आला असून त्यामधून एकूण ८३ कोटी ३६ लाख ११ हजार १३४ रुपये रकमेचे मनी ट्रेल व्यवहार आढळून आले आहेत. या गुन्ह्यात अधिक सखोल तपास सुरू असून विविध राज्यांमधील सायबर फसवणूक प्रकरणांशी या व्यवहारांचे संबंध असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच या प्रकरणामध्ये वापरण्यात आलेल्या बँक खात्यांबाबत, संबंधित लाभार्थी, आर्थिक व्यवहारांचे अंतिम लाभार्थी तसेच इतर सहआरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक निकेतन कदम, अपर पोलिस अधीक्षक दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस करीत आहेत.