युरेशिया ग्लोबलमध्ये सहभाग
अमरावती,
'Sanskriti Shankarpure' takes global leap अमरावतीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवणारी शहरातील संस्कृती दिलीप शंकरपुरे हिने रशियातील ओरेनबुर्ग येथे २३ ते २८ जून दरम्यान आयोजित ११व्या इंटरनॅशनल यूथ फोरम ‘युरेशिया ग्लोबल-२०२६’ मध्ये भारताचे प्रभावी प्रतिनिधित्व करून अमरावतीसह देशाचे नाव जागतिक व्यासपीठावर उज्ज्वल केले आहे.
सध्या रशियातील सिम्फेरोपोल येथील क्रिमियन फेडरल युनिव्हर्सिटीच्या इंटरनॅशनल मेडिकल फॅकल्टीमध्ये एमबीबीएसचे पाचव्या वर्षाचे शिक्षण घेत असलेल्या संस्कृतीने अत्यंत स्पर्धात्मक आंतरराष्ट्रीय प्रक्रियेनंतर या प्रतिष्ठित युवा मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला. या जागतिक परिषदेत रशियातील ५९ प्रदेशांतील तसेच २४ देशांतील १६० युवा प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला होता. सहा दिवस चाललेल्या परिषदेत नेतृत्व विकास, नवकल्पना, जागतिक सहकार्य, सामाजिक परिवर्तन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या विषयांवरील कार्यशाळा व पॅनेल चर्चांमध्ये संस्कृतीने सक्रिय सहभाग घेत भारताचा दृष्टिकोन प्रभावीपणे मांडला. विविध देशांतील युवा प्रतिनिधींशी संवाद साधत भारतीय संस्कृती, युवा नेतृत्व आणि सामाजिक मूल्यांची ओळखही तिने जगासमोर करून दिली.