30 चितळांचे नव्या अधिवासात यशस्वीपणे स्थलांतर

    दिनांक :03-Jul-2026
Total Views |
* ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात तृणभक्षी प्राण्यांची स्थलांतर मोहिम
* एकूण 80 चितळांच्या स्थलांतराची परवानगी

चंद्रपूर, 
Tadoba Andhari Tiger Reserve ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रातील कोलारा वनपरिक्षेत्रातल्या जामणीतून कोळसा वनपरिक्षेत्रातील गवताळ प्रदेशात चितळ स्थलांतराच्या पहिल्या टप्प्यास सुरुवात झाली आहे. 30 चितळांचे त्यांच्या नव्या अधिवासात यशस्वीपणे स्थलांतर करण्यात आले. या मोहिमे अंतर्गत 80 चितळांच्या स्थलांतरासाठी राज्य शासनाची परवानगी प्राप्त झाली आहे.
 
 
Chital
 
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरात भक्ष्य प्राण्यांच्या घनतेतील प्रादेशिक असमतोल दूर करण्याच्या उद्देशाने टप्प्याटप्प्याने तृणभक्षी प्राण्यांच्या अंतर्गत स्थलांतर मोहिमेला प्रारंभ करण्यात आला आहे. 30 जून रोजी 9 मादी व 7 नर अशा एकूण 16 चितळांचे स्थलांतर करण्यात आले. त्यानंतर 1 जुलै रोजी 11 मादी व 3 नर अशा एकूण 14 चितळांचे स्थलांतर करण्यात आले. कठोर सुरक्षा उपाययोजना, पूर्वतयारी म्हणून घेण्यात आलेल्या ‘मॉक ड्रिल्स‘ आणि अत्यंत अचूक नियोजनामुळे संपूर्ण मोहिमेदरम्यान कोणत्याही वन्यप्राण्याला दुखापत झाली नाही किंवा जीवितहानी झाली नाही. या परिसंस्था व्यवस्थापन आराखड्यानूसार आगामी टप्प्यांमध्ये आणखी 50 चितळांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. याच पद्धतीचा वापर करून मागील वर्षी कोलारा वनपरिक्षेत्रातील जामणी गवताळ प्रदेशातून येथे 107 चितळांचे यशस्वी स्थलांतर करण्यात आले होते.
 
 
ही संपूर्ण मोहीम ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. प्रभू नाथ शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपसंचालक (कोअर) आनंद रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. सहायक वनसंरक्षक विवेक नातू व अनिरुद्ध ढगे तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल वैद्य, रुंदन काटकर आणि संबंधित क्षेत्रीय कर्मचार्‍यांनी ही मोहीम यशस्वीरीत्या राबविली.
अत्याधुनिक ‘बोमा’ तंत्रज्ञानाचा वापर
जामणी गवताळ प्रदेशातील चितळांसाठी अनुकूल अधिवास व शाश्वत लोकसंख्या लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेल्या ‘बोमा’ तंत्रज्ञानाचा वापर चितळांना सुरक्षितरीत्या पकडण्यासाठी करण्यात आला. बोमा संरचनेतून चितळांना थेट विशेष रचनेच्या स्थलांतर वाहनांमध्ये नेण्यात आले. या वाहनांचे आतील भाग वन्यप्राण्यांवरील ताण कमीत कमी राहील तसेच प्रवासादरम्यान त्यांना जास्तीत जास्त सुरक्षितता व आराम मिळेल, अशा पद्धतीने तयार करण्यात आले होते.