मुंबई
Aryan Khan बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान पुन्हा एकदा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. लंडनमध्ये एका तरुणीसोबत फिरताना तो स्पॉट झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यानंतर आर्यनच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दोघांना लंडनमधील एका कॅसिनोबाहेर एकत्र पाहिल्याचा दावा करण्यात येत आहे.
व्हिडीओ समोर आल्यानंतर आर्यनसोबत दिसणारी तरुणी नेमकी कोण, याबाबत सोशल मीडियावर विविध तर्क-वितर्क रंगले. त्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी ती आर्टिस्ट विनी ताकेर असल्याचा दावा केला. व्हायरल झालेल्या छायाचित्रांमध्ये आर्यन खान काळ्या टी-शर्ट, ट्राउझर्स आणि स्नीकर्स अशा कॅज्युअल लूकमध्ये दिसत असून, त्याच्यासोबत असलेली विनी ताकेरही काळ्या रंगाच्या पोशाखात दिसत आहे. हे फोटो समोर आल्यानंतर दोघांमध्ये विशेष मैत्री किंवा नातेसंबंध असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर वेग आला आहे.
दरम्यान, या चर्चांना आणखी हवा मिळाली ती विनी ताकेरच्या सोशल मीडिया पोस्टमुळे. विनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लंडन दौऱ्यातील काही छायाचित्रे शेअर करत, ‘लंडन आय लव्ह यू…’ असे कॅप्शन दिले आहे. त्यानंतर आर्यनसोबत ती दिसल्याने दोघांच्या अफेअरच्या चर्चांना अधिकच उधाण आले. काही नेटकऱ्यांनी दोघे सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करत असल्याचाही दावा केला आहे. मात्र, या चर्चांवर आर्यन खान किंवा विनी ताकेर यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
यापूर्वीही आर्यन खानचे नाव ब्राझिलियन अभिनेत्री आणि मॉडेल लारिसा बोनेसी हिच्यासोबत जोडले गेले होते. त्या दोघांचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसेच ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या मालिकेच्या प्रीमियरलाही लारिसा उपस्थित असल्याने त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना जोर आला होता. मात्र, त्या वेळीही या दोघांनी नात्याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट केली नव्हती.सध्या लंडनमधील व्हायरल व्हिडीओ आणि सोशल मीडियावरील चर्चांमुळे आर्यन खानच्या खासगी आयुष्याबाबत पुन्हा एकदा विविध तर्क-वितर्कांना उधाण आले असले, तरी त्याच्या कथित नात्याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.