जीव वाचवण्यासाठी अनेकांच्या उड्या... भिवंडीत मध्यरात्री काय घडलं?

    दिनांक :31-Jul-2026
Total Views |
भिवंडी
Bhiwandi Building Collapse भिवंडीतील नारपोली परिसरातील गंगारामवाडी येथे असलेली चार मजली कोहिनूर इमारत गुरुवारी रात्री कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. रात्रीपासून घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून ढिगाऱ्याखालून नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दुर्घटना अत्यंत भीषण होती, अशी प्रतिक्रिया पीडित आणि प्रत्यक्षदर्शींनी दिली.
 

Bhiwandi Building Collapse 
दुरुस्तीचे काम सुरू असताना ही चार मजली इमारत क्षणार्धात कोसळली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, धोकादायक घोषित करण्यात आलेल्या इमारतीच्या दुरुस्तीदरम्यान एकाच वेळी तीन नादुरुस्त खांब काढण्यात आले. इमारतीला कोणताही आधार (सपोर्ट) न दिल्याने संपूर्ण संरचना अचानक ढासळली आणि इमारत कोसळली. परिणामी, ढिगाऱ्याखाली कामगारांसह काही नागरिक अडकले.
थरारक दृश्य
इमारत कोसळण्यास सुरुवात Bhiwandi Building Collapse  होताच अनेकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली. काहींनी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उड्या मारून स्वतःचा जीव वाचवला, तर काहींनी मिळेल त्या मार्गाने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. या गोंधळात मुके जीवही एकमेकांना वाचवण्यासाठी धडपड करत असल्याचे हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळाले. दुर्घटनेतील पीडित आणि प्रत्यक्षदर्शींनी त्या क्षणांचा थरारक अनुभव सांगितला.दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य हाती घेत अनेकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. तसेच कोहिनूर इमारतीतील ३० ते ४० रहिवाशांचे शेजारच्या इमारतीत सुरक्षित स्थलांतर करण्यात आले.दरम्यान, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) पथकाने तब्बल १४ तासांच्या शोधमोहीमेनंतर नववा मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढला. आतापर्यंत सापडलेले सर्व ९ मृतदेह शवविच्छेदनासाठी आयजीएम रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्निशमन दल, भिवंडी महापालिका तसेच आपत्कालीन सेवा पथके घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य राबवत आहेत. मात्र, ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.