मुंबई
Kirti Kulhari मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री आणि निर्माती कीर्ति कुल्हारी यांची सायबर फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या मोबाईल फोन आणि क्रेडिट कार्डशी संबंधित माहितीचा गैरवापर करत अवघ्या काही मिनिटांत 2 लाख 43 हजार 852 रुपयांची रक्कम लंपास केली. या प्रकरणी कीर्ति कुल्हारी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, अंबोली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कीर्ति कुल्हारी या वर्सोवा येथील यारी रोडवरील संगीता अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहतात. 24 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 9.31 वाजता त्या अंधेरी पश्चिम येथील फन रिपब्लिक मॉलजवळील सिनेपोलिस थिएटरमध्ये चित्रपट पाहत होत्या. त्याचवेळी त्यांच्या मोबाईलवर क्रेडिट कार्डवरून एअरोमेक्सिको एअरलाईन्ससाठी 2,525 अमेरिकन डॉलर्स खर्च झाल्याचा अलर्ट संदेश आला.
परदेशातील या संशयास्पद व्यवहाराचा संदेश मिळताच कीर्ति कुल्हारी यांनी तातडीने बँकेच्या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधला. बँकेच्या अधिकाऱ्यांनी तपास केल्यानंतर त्यांच्या क्रेडिट कार्डवरून परवानगीशिवाय चार वेगवेगळे मोठे व्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव संबंधित क्रेडिट कार्ड तात्काळ ब्लॉक करण्यात आले.
या घटनेनंतर कीर्ति कुल्हारी यांनी अंबोली पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात सायबर गुन्हेगाराविरोधात गुन्हा नोंदवला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.