अनिल कांबळे,
नागपूर,
drug-trafficking : अंमली पदार्थांच्या तस्करीत आता गुन्हेगारांनी शिरकाव केला असून मेफेड्रोन तस्करीच्या प्रयत्नात गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने दोन गुंडांना अटक करून त्यांच्या ताब्यातून ३० लाख २० हजाराची १५१ ग्रॅम मेफेड्रोन पावडर जप्त करण्यात आली. मो. नियाज समसूल अंसारी (३४) राजनगर आणि मो. असलम समसूल अंसारी (३४) दोन्ही रा. राजनगर, वाठोडा ले आऊट अशी या तस्करांची नावे आहेत.
दोन्ही आरोपी हे मेफेड्रोनची खेप देण्यासाठी जात असल्याची माहिती युनिट ३ च्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वैष्णवीनगर येथील विस्टा टॅटू स्टुडिओजवळ सापळा रचला. दोघेही भाऊ दुचाकी आणि कारने घटनास्थळाहून जात असताना पोलिसांनी त्यांना अडविले. त्यांच्या कारची झडती घेतली असता १५१ मेफेड्रोन पावडर मिळून आली. दोन्ही आरोपींच्या ताब्यातून मेफेड्रोन पावडर, दोन मोबाईल, इलेक्ट्रीक वजनकाटा, होंडा सिटी कार आणि सुझुकी ए क्सेस दुचाकी असा ४३ लाख ७४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. हा माल त्यांनी फरार आरोपी विशाल उर्फ फल्ली गुप्ता याच्या जवळून घेतल्याची कबुली दिली. नियाजच्या विरोधात यापूर्वी अंमली पदार्थाची तस्करी केल्याचा गुन्हा दाखल असून, तर असलमच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे. विशाल उर्फ फल्लीच्या विरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, दरोडा आणि शस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी भांडेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून दोन्ही तस्करांना अटक केली. ही कारवाई पोलिस उपायुक्त (डिटेक्शन) दीपक अग्रवाल आणि सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे शाखा) वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथक तीनचे प्रमुख पोलिस निरीक्षक अतूल मोहनकर यांच्या पथकातील अमित देशमुख, ईश्वर खोरडे, रोहित काळे, अजय पाटील, दिनेश डवरे, विजय श्रीवास, विवेक भोयर, चंद्रकांत डेकाटे, दीपक लाकडे यांनी केली.
बेझनबागमध्ये ड्रग्ज तस्कर अटकेत
त्याचप्रमाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने बेझनबाग येथे कारवाई करून अमन मुकेश मोटघरे (२६) मायानगर, इंदोरा यास अटक करून त्याच्या ताब्यातून १८.६०० ग्रॅम मेफेड्रोन पावडर जप्त केली. शुक्रवारच्या मध्यरात्री अमन हा बेझनबाग येथील अश्विन अमृततुल्य या दुकानासमोर विना क्रमांकाच्या दुचाकीसह कुणाचीतरी वाट पहात उभा होता. पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ १८.६०० ग्रॅम मेफेड्रोन जप्त केली. पोलिसांनी मेफेड्रोन, आयफोन आणि दुचाकी असा ३ लाख ४६ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. मायानगर येथील प्रतिक ढवळे याच्या ताब्यातून माल घेतल्याची त्याने कबुली दिली. अमनला जरीपटका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.