तभा वृत्तसेवा
घाटंजी,
kgn-electric-and-furniture-warehouse : शहरातील आंबेडकर वॉर्ड परिसरातील केजीएन इलेक्ट्रिक अँड फर्निचरच्या गोदामाला व दुकानाला गुरुवारी मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून लाखो रुपयांचा माल जळून खाक झाल्याची घटना घडली. या आगीत इलेक्ट्रॉनिक साहित्य, फर्निचर, रेडिमेड कपडे, प्लास्टिक साहित्य, मालवाहू वाहन व मोटारसायकल जळाली. आगीत सुमारे 42 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार देण्यात आली आहे.
मजिद सलमान नवशाद अली (वय 36), गुरुदेव वॉर्ड, घाटंजी यांच्या तक्रारीनुसार, आंबेडकर वॉर्ड येथील केजीएन इलेक्ट्रिक अँड फर्निचरच्या गोदामामध्ये विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक व फर्निचरचा माल साठवून ठेवण्यात आला होता.
30 जुलैच्या मध्यरात्री ते 31 जुलैच्या पहाटेदरम्यान गोदामात अचानक शॉर्टसर्किट होऊन आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण गोडाऊन धुराने व आगीच्या लोटांनी वेढले गेले. आग इतकी भीषण होती की आत ठेवलेले बहुतांश साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले.
आगीत अलमारी, फ्रिज, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, पलंग, स्टील फर्निचर, टिन साहित्य, प्लास्टिक फर्निचर, रेडिमेड कपडे, व्यावसायिक कागदपत्रे, बिलबुक, जीएसटी बिल फाईलसह मोठ्या प्रमाणात माल नष्ट झाला. गोदामात उभी असलेली एमएच26 एडी5203 क्रमांकाची 407 मालवाहू गाडी व टीव्हीएस स्पोर्ट मोटारसायकल देखील जळून नुकसानग्रस्त झाली. या आगीत सुमारे 42 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र तोपर्यंत गोडाऊनमधील बहुतांश साहित्य जळून खाक झाले होते. या प्रकरणी घाटंजी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.