वॉशिंग्टन,
hamas agrees to lay down arms गाझामध्ये हमास आणि इस्रायल यांच्यात एक ऐतिहासिक करार झाला आहे. हमास आणि इतर सर्व सशस्त्र संघटनांनी शस्त्रे सोडण्यास सहमती दर्शवली असून, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने गाझामधून माघार घेणार असल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली, तथापि इस्रायल अथवा हमासने करारासंदर्भात अधिकृत निवेदन जारी केले नाही.
ट्रम्प यांनी समाज माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले की, २०-सूत्री गाझा योजनेचा भाग म्हणून हमास इतर गटांनी गाझामध्ये स्थायी शांतता व सुरक्षेच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत शस्त्रे खाली ठेवण्यास सहमती दर्शवली आहे. अनेक महिन्यांच्या प्रयत्नांनंतर हा करार शक्य झाला. गाझाचे प्रशासन ‘नॅशनल कमिटी फॉर द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ गाझा’ (एनसीएजी ) नामक एका नवीन संस्थेकडे सोपवले जाईल. ही संस्था हमास आणि पॅलेस्टिनी प्रशासनापासून वेगळी असेल. याचे काम गाझामध्ये नागरी सेवा, प्रशासन आणि कायदा व सुव्यवस्था सांभाळणे असेल. या योजनेचा उद्देश गाझामध्ये एकच सरकार, कायदा आणि सुरक्षा व्यवस्था लागू करणे हा आहे.
निशस्त्रीकरण प्रक्रिया कशी असेल ?
योजनेनुसार, प्रथम हमास आपली शस्त्रे नवीन पॅलेस्टिनी पोलिसांना सुपूर्द करेल. त्यानंतर, अवजड शस्त्रे सुरक्षित ठिकाणी ठेवली जातील. शस्त्रे बनवणारे कारखाने आणि बोगदे नष्ट केले जातील. लहान शस्त्रे देखील पॅलेस्टिनी कायद्यानुसार जमा केली जातील. इतर सशस्त्र गटांना आणि युद्धादरम्यान तयार झालेल्या हमास-विरोधी मिलिशियालाही शस्त्रे सोडावी लागतील. संपूर्ण प्रक्रिया सुमारे ३५० दिवसापर्यंत चालू शकते. प्रत्येक टप्पा पूर्ण झाल्यानंतर स्वतंत्र देखरेख संस्था त्याची पुष्टी करतील.
शांती मंडळाद्वारे देखरेख
ट्रम्प यांनी सांगितले की, हा करार त्यांच्या २०-कलमी गाझा शांतता योजनेचा एक भाग आहे. या संपूर्ण योजनेवर ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखालील शांती मंडळाद्वारे देखरेख केली जात आहे. या करारानुसार, गाझामधील हमासचे राज्य पूर्णपणे संपुष्टात आणले जाईल. गाझाचा कारभार चालवण्यासाठी एक नवीन पॅलेस्टिनी सरकार स्थापन केले जाईल.