मालेगाव,
Husband murdered with lover's help पती हा आपल्या अनैतिक प्रेमात अडसर ठरत असल्याने पत्नीने स्वतःच्या प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजून आणि दोरीने गळा आवळून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना मालेगाव तालुयातील वाकळवाडी येथे ३० जुलै रोजी रात्री उशीरा उघडकीस आली. या काळीज पिळवटून टाकणार्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या प्रकरणी मृतकाची पत्नी व तिचा कथित प्रियकराविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृतक सुरेश राजाराम झळके (वय ३०) रा. अमानी ता. मालेगाव हा तरुण गेल्या चार-पाच दिवसांपासून वाकळवाडी येथील आपल्या सासुरवाडीला गेला होता. ३० जुलै रोजी वाकळवाडी शिवारातील सुनील चोंडकर यांच्या शेतात सुरेश याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलिस स्टेशन चे ठाणेदार राजेश खेरडे आणि एलसीबी प्रमुख सुधाकर आढे यांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. मृतक सुरेश याच्या मृत्यूबाबत संशय बळावल्याने मालेगाव पोलिसांनी त्याची पत्नी आशा सुरेश झळके आणि तिचा प्रियकर महादेव बजरंग अंभोरे (वय २५) रा. भूर, ता. मंगरुळनाथ या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली.
पती सुरेश आपल्या प्रेमात अडसर ठरत असल्याने पत्नी आशा हिने प्रियकर महादेव याच्यासोबत मिळून पतीचा कायमचा काटा काढण्याचा कट रचला. ३० जुलै रोजी संशयित आरोपींनी सुरेश याला बेसुमार दारू पाजली. तो नशेत पूर्णपणे असहाय्य झाल्यानंतर दोघांनी मिळून दोरीने त्याचा गळा घट्ट आवळून फाशी देवून खून केला. हा प्रकार आत्महत्या किंवा अपघात वाटावा अशा बेताने मृतदेह शेतात फेकून दिला. मालेगाव पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी सुरुवातीला अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर रात्री उशिरा ही हत्या सुरेश याच्या पत्नीने आपल्या प्रियकर महादेव याला सोबत घेऊन केल्याचे उघडकीस आले.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक व वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश धोत्रे, पोलिस उपनिरीक्षक गोखले, पोहेकॉ गजानन झगरे, आशिष बिडवे, ज्ञानदेव मात्रे, पोलिस अंमलदार अमोल इरतकर आणि चालक सुनील तायडे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेश खेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक त्र्यंबक गायकवाड करीत आहेत.