अलर्ट जारी! पावसाने राज्याला झोडपलं

    दिनांक :31-Jul-2026
Total Views |
मुंबई
Heavy Rain महाराष्ट्रात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली असून, राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. विदर्भातही पावसाची दमदार एन्ट्री झाली असून, अनेक ठिकाणी नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पावसाच्या विळख्यात सापडलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
 

Maharashtra heavy rain, Maharashtra monsoon update, Vidarbha flood, Wardha rain news, Buldhana heavy rainfall, Amravati flood situation, Dhule rain damage, Washim rain update, Nashik red alert, IMD weather alert Maharashtra, river flood Maharashtra, farmers crop loss, Maharashtra rain news today, monsoon latest news, Maharashtra disaster management 
विदर्भातील काही भागांत अतिवृष्टीमुळे पूल वाहून जाण्याच्या घटना घडल्या असून, शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला असता, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.
वर्धा जिल्ह्यात जोरदार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. वर्धा ते राळेगाव मार्गावरील सरूळ शिवारात यशोदा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. भिडी, रत्नापूर आणि शिरपूर परिसरातील जवळपास १५ घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. यशोदा नदीकाठावरील शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. अल्लीपूर ते टाकळी मार्गावर पुराच्या पाण्यात अडकलेल्या आणि झाडावर आसरा घेतलेल्या एका युवकाची सुरक्षित सुटका करण्यात आली. सध्या पाऊस थांबला असून, पुराचे पाणी हळूहळू ओसरत आहे.
जोरदार पाऊस
बुलढाणा जिल्ह्यात मागील२४ तासांपा सून सर्वच तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यांमध्ये सातपुडा पर्वतरांगांमध्ये झालेल्या पावसामुळे नदी-ओढ्यांना मोठा पूर आला आहे. पुराच्या पाण्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, जळगाव जामोद, संग्रामपूरसह इतर तालुक्यांमध्ये शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.
 
 
दरम्यान, संततधारेने बुलढाणा जिल्ह्यातील खरीप पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात सुमारे ९६ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, पिके वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहेत. मागील २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ११.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जळगाव जामोद, खामगाव, शेगाव आणि संग्रामपूर तालुक्यांमध्ये जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. या पावसामुळे जमिनीत पिकांना पुढील काही दिवसांसाठी आवश्यक ओलावा निर्माण झाला आहे. मात्र, शेगाव येथे घराची भिंत कोसळून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
 
 
बुलढाण्यातील जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यांमध्ये अतिवृष्टीसदृश पाऊस झाला असून, अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे. नदीकाठावरील शेतीचे नुकसान झाले असून, शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील नदीला पूर आला असून, येणगाव, वडशिंगी, खर्डा आणि माडाखेडसह भेंडवड परिसरातील नदी-नालेही ओसंडून वाहत आहेत.
अमरावती जिल्ह्यातही गेल्या २४ तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खर्बी गुंड परिसरात शेतांमध्ये पाणी साचून तलावासारखी स्थिती निर्माण झाली आहे. अनेक विद्युत खांब कोसळले असून, लिंबूच्या बागाही पाण्याखाली गेल्या आहेत. दिघी कोल्हे गावात रस्त्याला नदीचे स्वरूप आले असून, नदीला पूर आल्याने पुराचे पाणी गावात शिरले आहे. प्रशासनाने गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नांदगाव खंडेश्वर शहरातील दुकाने आणि नागरिकांच्या घरांमध्येही पाणी शिरले आहे. अमरावती शहरासह परिसरासाठी हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
धुळे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक भागांतील शेती जलमय झाली आहे. धुळे, शिरपूर, साक्री आणि शिंदखेडा तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर खरीप पिके पाण्याखाली गेली आहेत. सोयाबीन, मका, कापूस आणि इतर खरीप पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही भागांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरला असला तरी पाण्याचा निचरा होत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. प्रशासनाने पंचनामे करून तातडीने मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
 
 
धुळे शहरातही पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, महापालिकेकडून योग्य साफसफाई न झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. विविध शाळांच्या आवारातही पाणी साचले आहे.
 
 
नंदुरबार जिल्ह्यात सलग तीन दिवसांच्या रिमझिम पावसानंतर जोरदार पावसाने पुनरागमन केले आहे. रात्रभरापासून नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत पाऊस सुरू आहे. जून महिना कोरडा गेल्यानंतर आणि जुलै महिन्याच्या अखेरीस झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १९.८ टक्के पावसाची नोंद झाली होती, त्यामुळे खरीप हंगामातील सुमारे ४० टक्के पेरण्या रखडल्या होत्या. आता या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना वेग मिळण्याची शक्यता आहे. कापूस, मिरची आणि मका पिकांना याचा फायदा होणार असून, शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
 
 
वाशिम जिल्ह्यात रात्रभर झालेल्या जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. वाळकी, दोडकी, जुमडा गावांसह वाशिम शहरातील शासकीय विश्रामगृह परिसरातही एक मोठे झाड कोसळले. सुदैवाने ही घटना रात्री घडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. रिसोड मार्गावरील धोडप बुद्रुक येथील पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
 
 
नाशिक जिल्ह्यात हवामान विभागाने पुढील तीन तासांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, नदीकाठावरील नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून २४९८ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
 
 
राज्यातील विविध भागांत सुरू असलेल्या या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पाणीटंचाईचे संकट दूर होण्याची आशा निर्माण झाली असली, तरी पूरस्थिती, शेतीचे नुकसान आणि जनजीवनावरील परिणाम यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.