मुंबई
Radhakrishna Vikhe Patil मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्ट रोजी आंदोलनाची घोषणा केली आहे. सरकारकडून आपल्याला वेड्यात काढण्याचे काम सुरू असल्याचा आरोप करत जरांगे यांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे. मात्र, मनोज जरांगे यांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, असे सांगत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
मनोज जरांगे यांनी आंदोलनाची तयारी सुरू केल्यानंतर सरकारकडून हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत मराठा आरक्षणासंदर्भातील विविध निर्णयांची माहिती दिली.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “आम्ही शिष्यवृत्ती पुन्हा सुरू केली आहे. आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना मदत करण्यात आली आहे. मृत्यूमुखी पडलेल्या 32 जणांच्या वारसांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यांना महामंडळ आणि एमआयडीसीमध्ये नोकरी देण्याचा निर्णय झाला आहे. बंद झालेल्या योजना पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत.”ते पुढे म्हणाले की, सारथी संस्थेच्या माध्यमातून यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या जागा 400 पर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी एसओपी तयार करण्यात आली असून, प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडून हेल्पलाइन जारी करण्यात आली आहे. या अंमलबजावणीचा आढावा प्रत्येक सोमवारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच जात प्रमाणपत्र मिळवताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.महाविकास आघाडीवर टीका करताना विखे पाटील यांनी सांगितले की, सरकारने वेळोवेळी केलेल्या कार्यवाहीमुळे मनोज जरांगे यांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. महाविकास आघाडीच्या काळात काही निर्णय रद्द झाल्याने समाजाचे मोठे नुकसान झाले. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. शिंदे समितीने मोठे काम केले असून, आतापर्यंत 58 लाख नोंदी शोधण्यात आल्या आहेत आणि हे काम अद्याप सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.“शिंदे समितीला 2027 Radhakrishna Vikhe Patil पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. निर्णयांची अंमलबजावणी करण्यात शासन कुठेही कमी पडलेले नाही. काही अडचणी असतील तर त्या दूर केल्या जातील. मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेली भूमिका यापूर्वी कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी घेतली नव्हती. सरकारची भूमिका सकारात्मक आहे. जरांगे यांची भावना योग्य असली तरी त्यांना आंदोलनाची वेळ येणार नाही,” असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.दरम्यान, अभिजीत दीपके यांच्या वक्तव्यावरही विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “अभिजीत दीपके यांनी त्यांना कोणी धमकी दिली, त्याचे नाव सांगावे. संसदेत विद्यार्थ्यांसाठी कायदा करण्यात आला आहे. मात्र काँग्रेस केवळ आंदोलनाच्या माध्यमातून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारची भूमिका योग्य असताना दीपके यांनी अशी वक्तव्य करणे चुकीचे आहे. संदिग्धता निर्माण करण्यात काही अर्थ नाही,” असे ते म्हणाले.
राजकीय पक्षांकडून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत विखे पाटील यांनी सांगितले की, ज्यांचा जनाधार कमी झाला आहे, ते आंदोलनाच्या माध्यमातून राजकारण करताना दिसत आहेत.