जिल्हाधिकारी, आमदारांनी केली पूरग्रस्त भागांची पाहणी

मुसळधार पावसाचा जोरदार फटका

    दिनांक :31-Jul-2026
Total Views |
धामणगाव रेल्वे, 
mlas-inspected-flood-affected-areas : धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील धामणगाव, चांदूररेल्वे व नांदगाव खंडेश्वर या तिन्ही तालुक्यांत गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती आणि घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पूर परिस्थितीबाबत आणि अनेक कुटुंबांना स्थलांतरित केलेल्या ठिकाणांची आमदार प्रताप अडसड यांनी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्यासह पाहणी केली. या संकटाचा सामना शासन आणि प्रशासन एकत्रित करीत असून नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
 
 
K
 
धामणगाव रेल्वे, चांदूररेल्वे, नांदगाव खंडेश्वर या तिन्ही तालुक्यांत बुधवारी व गुरुवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसाचा सर्वाधिक फटका नांदगाव खंडेश्वर तालुक्याला बसला. अनेक गावांतील घरात पाणी शिरल्यामुळे कुटुंबांना स्थलांतरित करावे लागले. या पावसामुळे अनेक रस्ते बंद होते. दरम्यान शुक्रवारी सकाळी आमदार अडसड यांनी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धामक, धानोरा शिखरा, मंगरूळ चव्हाळा तसेच चांदूररेल्वे व धामणगाव रेल्वे तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी नांदगाव खंडेश्वर तालुक्यात जिल्हाधिकारी आशिष येरेकर तळ ठोकून होते. रस्त्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे तसेच भविष्यात अशा आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जावे लागू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन आ. अडसड यांनी दिले. पाहणीदौऱ्यात उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे, नांदगावच्या तहसीलदार अश्विनी जाधव, गटविकास अधिकारी तसेच संबंधित पूरग्रस्त गावांतील तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी उपस्थित होते.
 
 
//अनेक गावांचा संपर्क तुटला
 
 
धामणगाव रेल्वेचे तहसीलदार अभय घोरपडे यांची तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा करीत आढावा घेतला. पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहे. पुलगाव ते देवगाव मार्गावरील रायपूर कासारखेडा गावानजीक नागपूर - छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस हायवेवर खोलाड नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. विरुळ व अशोक नगरजवळील विदर्भ नदीला व सोनेगाव खर्डा येथील नदीला पूर आल्याने या गावांचा संपर्क तुटला होता. तालुक्यातील वडगाव राजदी येथील बापूराव पाटील, चिंचोली येथील विलास राऊत यांच्या घराचे पावसामुळे नुकसान झाले. मंगरुळ दस्तगीरजवळील आर्वी पेठ भागात पावसामुळे भयाण परिस्थिती निर्माण झाली होती. पुराच्या पाण्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने नुकसानग्रस्तांचे पंचनामे करण्याची प्रक्रिया प्रारंभ केली आहे.
मेळघाटात जोरदार पाऊस
 
धारणी तालुक्यात चार दिवसांपासून संततधार पाऊस येत आहे. शुक्रवारी धारणीचा आठवडी बाजार पावसामुळे भरलाच नाही. तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात पुढील २४ तासांत जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या ग्रामस्थांनी सावध राहावे, अशी सूचना देण्यात आली आहे. धारणी भागातील सावलीखेडा मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. मेळघाटातील तापी, गडगा, खंडू, खापरा, सिपना, कावरा, मधवा अलईसह सर्व नद्यांना पूर आलेले आहे.