मुंबईत मान्सून ओपीडी सज्ज

डेंग्यू, मलेरिया, लेप्टोच्या संशयित रुग्णांमध्ये वाढ

    दिनांक :31-Jul-2026
Total Views |
मुंबई
Mumbai Monsoon मुंबईत पावसाचा जोर वाढत असतानाच पावसाळी आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेची मान्सून ओपीडी यंत्रणा सक्रिय झाली आहे. शहरातील प्रमुख रुग्णालयांमध्ये सुरू करण्यात आलेल्या विशेष ओपीडींमध्ये ताप, डेंग्यू, मलेरिया आणि लेप्टोस्पायरोसिसच्या संशयित रुग्णांची नियमित तपासणी केली जात असून, लक्षणे आढळल्यास रुग्णांना तातडीने दाखल करून रक्त तपासण्या व आवश्यक उपचार सुरू केले जात आहेत. संभाव्य रुग्णवाढ लक्षात घेऊन काही रुग्णालयांमध्ये अतिरिक्त खाटा आणि विशेष वैद्यकीय व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
 

Mumbai Monsoon OPD Active as Dengue, Malaria and Leptospirosis Suspected Cases Rise 
१ जूनपासून सुरू झालेल्या या मान्सून ओपीडींमध्ये आतापर्यंत शेकडो रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, गरजेनुसार अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ताप, अंगदुखी, सर्दी, खोकला, तसेच मलेरिया, डेंग्यू आणि लेप्टोस्पायरोसिसच्या संशयित लक्षणांसह नागरिक उपचारासाठी रुग्णालयांमध्ये येत आहेत. पावसाळी आजारांचे लवकर निदान करून तातडीने उपचार उपलब्ध करून देण्यावर या ओपीडींमधून भर दिला जात आहे.
सायन रुग्णालयातील मान्सून ओपीडीमध्ये सकाळपासूनच रुग्णांची तपासणी सुरू असल्याचे चित्र आहे. ताप आणि व्हायरल संसर्गाच्या लक्षणांसह येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे यांनी सांगितले की, १ जूनपासून दररोज सरासरी १० ते १५ रुग्ण मान्सून ओपीडीमध्ये दाखल होत आहेत. प्रत्येक रुग्णाची तपासणी करून आवश्यकतेनुसार रक्त तपासण्या आणि पुढील उपचार केले जात आहेत.
 
 
कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयातही पावसाळी आजारांच्या तपासणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय गुप्ता यांनी सांगितले की, आतापर्यंत सुमारे १८० रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. तपासणीदरम्यान डेंग्यू किंवा लेप्टोस्पायरोसिसची लक्षणे आढळल्यास संबंधित रुग्णांना तातडीने दाखल करून उपचार सुरू केले जात आहेत.विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयात मान्सून ओपीडीमध्ये तुलनेने अधिक गर्दी दिसून येत आहे. रुग्णालयाच्या अधिष्ठात्री डॉ. छाया शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत २५६ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये १९० पुरुष आणि ७६ महिलांचा समावेश आहे. या कालावधीत सहा मलेरिया रुग्ण, १९ डेंग्यू रुग्ण आणि एक लेप्टोस्पायरोसिस रुग्ण आढळून आला आहे. प्रकृतीनुसार १५ रुग्णांना पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मुलुंड येथील अगरवाल रुग्णालयातही मान्सून ओपीडी कार्यरत असून, आतापर्यंत १५० रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. संभाव्य रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन रुग्णालयात अतिरिक्त ३० खाटांची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजूसिंग राठोड यांनी दिली.मुंबईत पावसाचा जोर कायम असताना सायन रुग्णालयाबाहेर तपासणीसाठी थांबलेले रुग्ण, कूपर रुग्णालयात वाढलेली डेंग्यू आणि मलेरियाच्या संशयितांची संख्या, तसेच शताब्दी रुग्णालयात लेप्टोच्या लक्षणांवर लक्ष ठेवणारी वैद्यकीय यंत्रणा, अशा स्वरूपात महापालिकेची मान्सून ओपीडी व्यवस्था पावसाळी आजारांविरोधातील लढ्यासाठी सज्ज झाली आहे.