राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या जोडीचा ‘मूर्ती’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

    दिनांक :31-Jul-2026
Total Views |
मुंबई
Marathi Film Moorti सामाजिक वास्तवाला प्रभावीपणे पडद्यावर मांडणारे आणि आशयप्रधान चित्रपटांची परंपरा जपणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते निर्माते अमोल कागणे आणि दिग्दर्शक शिवाजी लोटण पाटील पुन्हा एकदा नव्या मराठी चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘हलाल’ आणि ‘भोंगा’ या राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविलेल्या चित्रपटांनंतर त्यांच्या महत्त्वाकांक्षी निर्मितीतील ‘मूर्ती’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
 

National Award-Winning Duo Announces Marathi Film Moorti 
समाजातील ज्वलंत प्रश्नांना संवेदनशीलतेने हाताळण्याची आणि वास्तवाला प्रभावी सिनेमॅटिक रूप देण्याची ओळख दिग्दर्शक शिवाजी लोटण पाटील यांनी आपल्या चित्रपटांमधून निर्माण केली आहे. त्यांच्या चित्रपटांमध्ये केवळ मनोरंजनाला प्राधान्य नसून सामाजिक भान, वास्तवाचे दर्शन आणि विचारांना चालना देणारा आशय ठळकपणे दिसून येतो. पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या शिवाजी लोटण पाटील यांच्या प्रत्येक नव्या चित्रपटाकडे प्रेक्षकांसह चित्रपटसृष्टीचे विशेष लक्ष असते.
 
 
‘मूर्ती’ हा चित्रपटही एका वेगळ्या विषयाची प्रभावी मांडणी करत प्रेक्षकांना अंतर्मुख करणारा अनुभव देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या चित्रपटाची निर्मिती अमोल लक्ष्मण कागणे, लक्ष्मण एकनाथराव कागणे आणि शिवाजी लोटण पाटील यांनी केली असून, कथा, पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी शिवाजी लोटण पाटील यांनी सांभाळली आहे.
 
 
चित्रपटाच्या तांत्रिक बाजूची धुरा अनुभवी तंत्रज्ञांच्या टीमने सांभाळली आहे. मयुरेश जोशी यांनी छायांकन, हनी सातमकर यांनी संगीत, निलेश नवनाथ गावणे यांनी संकलन, तर रमेश इनामती यांनी ध्वनी संयोजन केले आहे. चित्रपटाचे कलादिग्दर्शन आकाश शिवाजी माळी यांनी केले असून, वेशभूषेची जबाबदारी माधव बाळुते यांनी पार पाडली आहे. मेकअप नितीन दांडेकर यांनी, तर स्थिर छायाचित्रण (स्टिल फोटोग्राफी) नितीन भावसार यांनी केले आहे. महेंद्र माधुकर तिसगे यांनी कार्यकारी निर्माता म्हणून जबाबदारी सांभाळली असून, चित्रपटाच्या वितरणाची धुरा फिल्मास्त्र स्टुडिओचे अमेय खोपकर, अमोल कागणे आणि प्रणित वायकर यांच्याकडे आहे.राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या जोडीचा ‘मूर्ती’ हा चित्रपट वेगळ्या विषयासह आणि सामाजिक आशयाच्या प्रभावी मांडणीमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचा विषय ठरत असून, चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.